Narayan Rane: भविष्यात अशी घटना घडणार नाही; महाड कोर्टाने घेतली नारायण राणेंकडून लेखी हमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 12:22 AM2021-08-25T00:22:14+5:302021-08-25T00:26:56+5:30
Narayan Rane: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला.
महाड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला. यामुळे नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला असून, न्यायालयात दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. नारायण राणे यांना जामीन मंजूर करताना महाड न्यायालयाने काही अटी ठेवल्या आहेत. तसेच नारायण राणे यांचा व्हॉइस सॅम्पल घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. (mahad court take undertaking from narayan rane about cm uddhav thackeray criticism case)
नारायण राणे यांना मोठा दिलासा; महाड न्यायालयाकडून जामीन मंजूर
महाड न्यायालयाने नारायण राणे यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मंजूर करताना न्यायालयाने नारायण राणे यांच्याकडून लेखी हमी घेत काही अटी ठेवल्या आहेत. नारायण राणे यांनी पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये. तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये, अशा सूचना न्यायालायाने केल्या आहेत. याशिवाय, भविष्यात अशी घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी लेखी हमी न्यायालायाने घेतल्याचे सांगितले जात आहे. या व्यतिरिक्त रायगड गुन्हे शाखेसमोर ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी हजेरी लावावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. जवळपास तासभर न्यायालयाचे कामकाज चालले.
अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले...
जवळपास तासभर न्यायालयाचे कामकाज
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. नारायण राणे यांचे विधान म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या घटनात्मक पदाची पायमल्ली करणारे आहेत. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असून, जबाबदार व्यक्तीने अशी विधाने करणे कितपत योग्य आहे, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला. तसेच ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावर, नारायण राणे यांच्यावतीने कुडाळ येथील वकील संग्राम देसाई यांनी युक्तीवाद केला. नारायण राणे यांना अटक करताना रितसर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नारायण राणे केंद्रीय मंत्री असून, त्यांच्याविरोधात चुकीची कलमे लावण्यात आली आहेत. तसेच अटक करण्यापूर्वी कोणतीही लेखी नोटीस दिलेली नाही, असा युक्तीवाद वकिलांकडून करण्यात आला. तसेच नारायण राणे यांची प्रकृती ठीक नाही. दुपारी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचाही दाखला यावेळी न्यायालयाला देण्यात आला. अखेर पोलीस आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावत महाड न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला.