Mahad Flood: पूर ओसरला आता नवं संकट! महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याती भीती, २६ रुग्ण आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 07:50 PM2021-07-31T19:50:52+5:302021-07-31T19:51:16+5:30
Mahad Flood: महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरीत पडसाद पुर आेसरल्या नंतर सुरु झाले आहेत. महाडमध्ये आतापर्यंत 12 हजार 931 जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे
आविष्कार देसाई
लाेकमत न्यूज नेटवर्क
रायगड ः महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरीत पडसाद पुर आेसरल्या नंतर सुरु झाले आहेत. महाडमध्ये आतापर्यंत 12 हजार 931 जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे, तर 380 नागरिकांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये लेप्टोपायरोसिसचे 19, काेराेनाचे तीन, डेंग्यु आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण 26 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाड तालुक्यात महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाड आणि पाेलादपूर मध्ये अतिवृष्टीने पुर, दरडी काेसळल्या हाेत्या. महाड-तळीये मध्ये दरड काेसळल्याने 84 नागरिक डाेंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पैकी 53 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले उर्वरीत 31 जणांना मृत घाेषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी आहे. तसेच पाेलादपूर-केवनाळे आणि सुतारवाडी येथेही 11 जणांचा दरडीखाली गुदमरुन मृत्यू झाला. त्याचवेळी महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्रीला महापुर आला. तब्बल 15 फुटाहून अधिक पाणी हाेते.
महापुरात नागरिकांनी आपले प्राण वाचवले. आता महापुर आेसरला आहे. परंतू शहरासह अन्य भागांमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे लवकर लवकर स्वच्छता करण्याचे आव्हान सरकार आणि प्रशासना पुढे आहे. स्वच्छता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे.राेगराई पसरु नये यासाठी विविध ठिकाणची 18 वैद्यकीय पथक महाडमध्ये तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत आतापर्यंत तब्बल 12 हजार 931 नागरिकांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच एक हजार 416 जणांना टिटीचे इंजेक्शन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील काेराेनाचा प्रार्दुभाव थांबलेला नाही. त्यामुळे 380 नागरिकांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तीन जणांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे.
लॅप्टाेपायरसिसचे 19 रुग्ण सापडले आहेत, तर डेंग्यु आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण 26 रुग्ण सापडले आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली.महाड, पाेलादपूरमध्ये साथ राेगांचा फैलाव हाेऊ नये यासाठी आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.महाडमध्ये सध्या नागरिकांचे जीवनमान पुर्वपदावर येत आहे. पुरात उघड्यावर पडलेला संसार वेचण्यात नागरिक अद्यापही गुंतलेले आहेत. अशा विचित्र परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नागरिक काेराेना नियमांचे पालन कसे करणार असा प्रश्न आहे. दरम्यान, हाडमधील नागरिकांचा संसार उभा करतानाच या ठिकाणी साथराेग पसरु नये यासाठी सरकार आणि प्रशासनाला कठाेर मेहनत घ्यावी लागणार आहे.