Talai Landslide: मुख्यमंत्री ठाकरे तळीये दुर्घटनेची पाहणी करणार, हेलिकॉप्टरनं रवाना होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 11:19 AM2021-07-24T11:19:33+5:302021-07-24T11:20:06+5:30
Talai Landslide: महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
Talai Landslide: महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री मुंबईहून हेलिकॉप्टरनं महाडकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे.
दरडसंकटाचे ८५ बळी! शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक फटका
महाडच्या डोंगर कपाऱ्यात वसलेल्या तळीये गावावर दरड कोसळून जवळपास ३५ घरं गाडली गेली आहेत. यात आतापर्यंत ४९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अजूनही बचावकार्य सुरूच आहे.
महाडमध्ये आता पावसानं विश्रांती घेतलेली असल्यानं बचावकार्याला देखील वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे घटनास्थळावर तळीये गावातील कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तसेच घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. आज दुपारी मुंबईहून हेलिकॉप्टरनं महाडच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचतील. त्यानंतर तिथून रस्तेमार्गे दुपारी दीडच्या सुमारास तळीये गावात पोहोचणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातून देण्यात आली आहे.
दरम्यान, तळीये गावातील मृत्यूमुखींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची तर केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच बचावकार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे.