दासगाव : महाडमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. मात्र, याबाबत योग्य उपाययोजना होत नसल्याने महाडमधील वातावरण चांगलेच तापले. शिवसेनेचे शहराध्यक्ष नितीन पावले यांनी याबाबत आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. महाड नगरपालिकेने मात्र शिवसेनेकडून केलेले आरोप धुडकावून लावले आहेत. महाडमध्ये स्वच्छता काटेकोरपणे केली जात असून, जनतेच्या सूचनांवरही कारवाई केली जात असल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
महाडमध्ये गेल्या काही महिन्यांत तापाचे शेकडो रुग्ण उपचार घेत असून याबाबत स्थानिक पॅथॉलॉजी चालकांनी डेंग्यूसदृश तर काहीनी डेंग्यू बाबतचे अहवाल दिल्यानंतर डॉक्टरांनी डेंग्यूवर उपचार करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शनिवारी कांगोरीगड या शिवसेना कार्यालयावर महाड शहराध्यक्ष नितीन पावले यांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या कारभारावर टीका केली. या वेळी विरोधी पक्षनेते दीपक सावंत, बंडी पोटफोडे, महिला आघाडीप्रमुख विजयालक्षी पोटसुरे, नगरसेवक सुनील अगरवाल, निखिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. पालिकेच्या सर्व साधारण सभेतही हा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला; परंतु शहरांमध्ये डेंग्यूची साथ असल्याचे प्रशासनाकडून मान्य केले जात नाही. प्रशासनाला उपाय योजनाकरिता भाग पाडणे, त्याच बरोबर नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करणे, डेंग्यूचा फैलाव होऊ नये याकरिता नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी इत्यादी उपाय योजण्याचा आग्रह करण्यात आला. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात आली नाही, तर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.या पत्रकार परिषदेनंतर महाड नगरपालिकेनेही पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने केलेल्या आरोपांचे खंडण केले. या वेळी मुख्याधिकारी जीवन पाटील, महाड ट्रामा केअरचे डॉ. दीपक अडकमोल, आरोग्य सभापती प्रमोद महाडिक हे उपस्थित होते. महाड नगरपालिकेने स्वच्छता करण्यास कुठेच कुचराई केलेली नसून, महाडमध्ये पूर येऊन गेल्यानंतरही अवघ्या दोन दिवसांत युद्धपातळीवर स्वच्छता केली गेली होती. या वेळीही कोणतीच रोगराईजन्य स्थिती उद्भवली नाही. डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना केली जात असून डेंग्यूचे रुग्ण महाड शहरात तरी आढळले नसल्याचे स्पष्ट केले. तर महाड ट्रामा सेंटरचे डॉ. दीपक अडकमोल यांनी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी असल्याचे सांगितले.उपाययोजना सुरू असल्याचा पालिकेचा दावाअतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे महाडमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र नगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सद्यस्थिती शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने तापाची साथ बळावली आहे. अनेक रुग्णांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. काही डेंग्यूचे संशयितही आढळले आहे. मात्र शहरात स्वच्छता मोहीम सुरू असून तापाची साथ आटोक्यात असल्याचा दावा नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याविरोधात शिवसेनेने आवाज उठवला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.