महाड एमआयडीसीत कारखान्याचे रसायनयुक्त पाणी नाल्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 03:17 AM2019-06-23T03:17:24+5:302019-06-23T03:17:43+5:30

महाड तालुक्यात पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत महाड एमआयडीसीमधील अनेक कारखानदारांनी सरळ कारखान्यांच्या शेजारी असलेल्या गटारातून रसायनयुक्त पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

Mahad MIDC factory's chemical water drains! | महाड एमआयडीसीत कारखान्याचे रसायनयुक्त पाणी नाल्यात!

महाड एमआयडीसीत कारखान्याचे रसायनयुक्त पाणी नाल्यात!

Next

- सिकंदर अनवारे
दासगाव  - महाड तालुक्यात पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत महाड एमआयडीसीमधील अनेक कारखानदारांनी सरळ कारखान्यांच्या शेजारी असलेल्या गटारातून रसायनयुक्त पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे महाड एमआयडीसीमधील गटारे रंगीत झाली आहेत. येथील लासा कंपनीच्या खुल्या जागेत तर लाल रंगाचे पाणी साचलेले दिसून येत आहे. मात्र, गटारात पाणी सोडल्याप्रकरणी सानिका कंपनीला नोटीस बजावली आहे.
महाड एमआयडीसीमध्ये अधिकांश कारखाने हे रासायनिक उत्पादन करणारे कारखाने आहेत. यातून बाहेर पडणारे पाणी हे घातक असल्याने हे पाणी सामायिक सांडपाणी केंद्रात प्रक्रिया करून खाडीत सोडले जात आहे. असे असले तरी आजही नाल्यावाटे सांडपाणी सोडण्याचे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाड एमआयडीसी मधील नाले पुन्हा रंगीत पाण्याने वाहून निघाले आहेत. अद्याप पावसाने जम बसवला नसला, तरी काही दिवसांपासून विविध ठिकाणी रासायनिक रंगीत पाणी नाल्यावाटे वाहून जाताना दिसत आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील फायर स्टेशन आणि लासा केमिकल या कंपनीच्या मधील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत तलाव निर्माण झाले आहे. या तलावाला लाल रंगदेखील आला आहे. हा लाल रंग येथील केमोसोल या कंपनीतील पाण्यामुळे आला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

शिवाय सानिका केमिकलच्या मागील बाजूसदेखील गटारात रसायनमिश्रित पाणी दिसून आले आहे. याबाबत अनेक वेळा सानिका केमिकल कंपनीला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, या वेळीही स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पुन्हा नोटीस बजावण्याचे काम प्रदूषण मंडळाने केले आहे.

ऐन पावसाळ्यात सांडपाणी शेजारील वाहत्या नाल्यात सोडून देणे हे प्रकार यापूर्वी सर्रास होत होते. सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, एमआयडीसीमधील मोठ्या कंपन्या स्वत:च्या ईटीपीमध्ये शुद्धीकरण करून सीईटीपीला देतात. छोट्या कंपन्या मात्र यामध्ये अजून कुचराई करत असून आपले पाणी नाल्यात अगर कंपनी परिसरात सोडून देत असल्याचे अशा प्रकारावरून उघड होत आहे.

वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार

सानिका केमिकलच्या मागील बाजूस असलेल्या गटारात रासायनिक सांडपाणी आढळून आले आहे. या बाबत कंपनीला नोटीस देण्यात आली आहे. शिवाय वरिष्ठ कार्यालयालाही कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे महाड येथील क्षेत्र अधिकारी प्रकाश ताट यांनी सांगितले.

Web Title: Mahad MIDC factory's chemical water drains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड