बिरवाडी : महाड एमआयडीसी पोलिसांनी उस्मानाबाद येथील अल्पवयीन मुलाचा शोध घेतला आहे.महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई - गोवा महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल शेर-ए-पंजाब या ठिकाणी सौदागर संभाजी पखाले (१७, रा. इंदापूर जि. उस्मानाबाद) याचे १२ सप्टेंबरला उस्मानाबाद जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या आई- वडिलांनी वाशी पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेची नोंद वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. दरम्यान हा मुलगा मुंबई - गोवा महामार्गालगत असणाऱ्या शेर-ए-पंजाब हॉटेलमध्ये काम मागण्याकरिता आला असता तेथील व्यवस्थापक देबनाथ भागायला यांनी या मुलाबाबतची माहिती महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याला दिली. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पो. नाईक सचिन घरत, पो. कर्मचारी भोईर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता त्या पोलीस ठाण्यामध्ये त्या मुलाचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आल्याने २७ सप्टेंबरला महाड एमआयडीसी पोलिसांनी उस्मानाबाद पोलिसांना बोलावून त्या अल्पवयीन मुलाला त्यांच्या ताब्यात दिले. आई - वडिलांच्या त्रासाला कंटाळून तो मुलगा एसटीच्या आवडेल तिथे प्रवास असा चार दिवसांचा पास घेऊन महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिरवाडी व एमआयडीसी परिसरात आला होता. मात्र हॉटेल व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे महाड एमआयडीसी पोलिसांना हा मुलगा सापडला. ------४महाड एमआयडीसी पोलिसांनी त्या मुलाला आपल्या मूळ गावी परतवून आॅपरेशन मुस्कान यशस्वी केले. संपूर्ण महाराष्ट्रात हरविलेल्या मुलांना आपल्या आई-वडिलांपर्यंत पोहचविण्याकरिता आॅपरेशन मुस्कान सुरु करण्यात आले आहे. पोलिसांच्या या आॅपरेशन मुस्कानमध्ये हरवलेल्या मुलांचा शोध पोलीस महाराष्ट्रात घेत आहेत. यामुळे मुलांना आपले आई- वडील आणि घर पुन्हा मिळाले आहे.
महाड एमआयडीसी पोलिसांचे ‘आॅपरेशन मुस्कान’
By admin | Published: September 30, 2015 12:12 AM