महाड न. प. महाराष्ट्रात आदर्श ठरेल - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 02:49 AM2017-11-05T02:49:45+5:302017-11-05T02:49:52+5:30
दीडशे वर्षांच्या महाड नगरपरिषदेने केलेला शहराचा विकास या शहराच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसा असाच असून, माजी आमदार माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाड नगरपरिषद आपल्या कारभारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श आणि मॉडेल नगरपरिषद म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
महाड : दीडशे वर्षांच्या महाड नगरपरिषदेने केलेला शहराचा विकास या शहराच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसा असाच असून, माजी आमदार माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाड नगरपरिषद आपल्या कारभारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श आणि मॉडेल नगरपरिषद म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
सुमारे साडेसात कोटी रुपये खर्चून शिवाजी चौक परिसरात उभारण्यात येत असलेल्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी चव्हाण बोलत होते. या वेळी ९० लाख रुपये खर्चून उभारलेल्या अग्निशमन केंद्राच्या इमारतीचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री निसम खान, खा. हुसेन दलवाई, माजी आ. माणिक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरपरिषदेने कुठल्याही शासकीय निधीची वाट न पाहता, स्वत:च्या निधीतून या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हाती घेतले ही बाब कौतुकास्पद असल्याचे, अशोक चव्हाण यांनी सांगितले. नगरपरिषदेची ही भव्य वास्तू महाराष्ट्रात नंबर एक ठरेल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. माणिक जगताप यांनी प्रास्ताविकपर भाषणात माजी मुख्यमंत्र्यांनी या इमारतीचे भूमिपूजन केले असले, तरी या इमारतीचे उद्घाटन काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल, असे सांगताना दीड वर्षांत या इमारतीचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही माणिक जगताप यांनी या वेळी दिली.