Talai Landslide: तळीयेमध्ये काल दुपारी ४ वाजता दरड कोसळली, मदत आज पोहोचली, असं का? कोण काय म्हणालं वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 02:50 PM2021-07-23T14:50:01+5:302021-07-23T14:50:57+5:30
Talai Landslide: महाडमधील तळीये गावात दरड कोसळून अनेक कुटुंब दरडीखाली गाडली गेली आहेत. आतापर्यंत दरडीतून ३५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
Talai Landslide: महाडमधील तळीये गावात दरड कोसळून अनेक कुटुंब दरडीखाली गाडली गेली आहेत. आतापर्यंत दरडीतून ३५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पण ही दुर्घटना काल म्हणजेच २२ जुलैच्या दुपारी ४ वाजता घडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर विरोधकांनी स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. सध्याच्या घडीला एनडीआरएफ आणि इतर बचाव कार्याची पथकं घटनास्थळी दाखल असून बचाव कार्य सुरू आहे. पण आज दुपारी १ वाजता एनडीआरएफची तुकडी घटनास्थळावर दाखल झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. प्रवीण दरेकर स्वत: घटनास्थळावर उपस्थित असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
महाड तालुक्यातील तळीये हे डोंगर कपारीमध्ये वसलेलं गाव आहे. कालपासूनच्या मुसळधार पावसामुळे काल दुपारी चार वाजता तळीये गावावर दरड कोसळली. यात गावातील ३५ कुटुंब दरडीखाली आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, संपूर्ण महाडमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं एनडीआरएफच्या जवानांना घटनास्थळावर पोहोचण्यास अडचणी येत होत्या. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
"तळीये गावात दरड कोसळल्याची दुर्घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. पण संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसामुळे जवळपास १० ते १२ फूट पाणी साचलं होतं. संपर्क पूर्णपणे तुटला होता. कुणाशीच संपर्क साधता येत नव्हता. तळीयेकडे येणारे सर्व मार्ग बंद होते. तिथं जाणाऱ्या मार्गांवर १० ते १२ फूट पाणी आणि घाटमार्गे जायचं म्हटलं तर अनेक ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे रस्तेमार्ग पूर्णपणे बंद झाले होते. अखेर दरड वगैरे बाजूला सारून अखेर एनडीआरएफची पथकं इथं दाखल झाली आहेत", अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
प्रवीण दरेकर घटनास्थळी पोहोचले, अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं
तळीये गावातील दुर्घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोक्षी पक्षनेते प्रवीण दरेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांना गावकऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. गावकऱ्यांनीच बचावकार्य करुन अनेक मृतदेह बाहेर काढल्याची माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली. दरेकरांसोबत भाजप नेते गिरीश महाजन देखील घटनास्थळी दाखल झाले.
"आम्ही जर याठिकाणी पोहोचू शकतो, तर मग अधिकारी का पोहोचू शकले नाहीत. हा अतिशय वाईट प्रकार आहे. स्थानिक पातळीवरच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन काम करायला हवं. अशाप्रकारचं अक्षम्य दुर्लक्ष याआधी मी कधी पाहिलेलं नाही. लोकांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. गावकऱ्यांनाच मृतदेह बाहेर काढावे लागले आहेत", असा आरोप गिरीश महाजन यांनी यावेळी केला.
VIDEO: महाडमधील तळीये गावावरील दरड कोसळण्याप्रकरणी प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं, यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे देखील उपस्थित होत्या. @mipravindarekar@girishdmahajanpic.twitter.com/WjPuQOEr9E
— Lokmat (@MiLOKMAT) July 23, 2021
मदत कार्यला उशीर का झाला?
तळीये गावावर दरड कोसळली तेव्हा संपूर्ण महाडमध्ये तुफान पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तर तळीयेकडे येणाऱ्या मार्गांवर दरडी कोसळल्या होत्या. प्रशासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय बचावकार्य करणं अशक्य होतं. तरीही गावकऱ्यांनी मिळून बचावकार्य केलं. आज पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफची टीम आणि अधिकारी दाखल झाले.
"काल संपूर्ण दिवसभर मुसळधार पाऊस होता. त्यामुळे मदत कार्याला अडथळा येत होता. संध्याकाळच्या सुमारास हेलिकॉप्टरनं ऑपरेशन शक्य नव्हतं. रस्तेही सर्व बंद होते. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पावसानं आज उसंत घेतल्यानं पाणी ओसरलं, तसंच दरडी बाजूला सारण्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डची पथकं घटनास्थळी बचावकार्य करत आहेत", अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.