नागोठणे : नागोठणे बसस्थानकातून अनेक एसटी बसेसची ये-जा होते. मात्र, स्थानकात येणाऱ्या महाड, माणगाव, श्रीवर्धन आगाराच्या गाड्यांच्या तुलनेत याच आगारांच्या अनेक गाड्या महामार्गावरून परस्पर जात आहेत.येथील स्थानकात रोहे, पेण, मुरुड, अलिबाग, ठाणे, मुंबई, महाड, श्रीवर्धन, माणगाव आगारांच्या शेकडो एसटी बसेस दिवसभरात येत असतात. यात महाड १५, माणगाव ७ आणि श्रीवर्धन आगाराच्या २२ एसटी बसेस स्थानकात येत असल्या, तरी त्याच्या दुप्पट याच आगारांच्या गाड्या महामार्गावरून परस्पर जात असल्याचे स्पष्ट होत आहे. या स्थानकातून पेण, पनवेल, कल्याण, ठाणे, मुंबई, बोरीवली, वसई, नालासोपारा बाजूकडे जाणाºया-येणाºया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही या गाड्यांना नागोठणे बसस्थानकाचे वावडे का? असा प्रवाशांचा सवाल आहे.विशेष म्हणजे, येथील वाहतूक नियंत्रण कक्षात या गाड्यांची नोंद असतानाही त्या स्थानकात येत नसल्याने यामागचे नक्की रहस्य तरी काय? असा प्रवाशांचा सवाल आहे. सध्या अनेक शिवशाही वातानुकूलित एसटी बसेस मुंबई-गोवा महामार्गावरून धावत आहेत. मात्र, यातील श्रीवर्धन-भाइंदर-श्रीवर्धन ही एकच शिवशाही बस नित्यपणे नागोठणे बसस्थानकात येत असते. तरी इतर बसेसही येथे थांबणे गरजेचे आहे.
महाड, श्रीवर्धन, माणगाव एसटीला नागोठणेचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:17 AM