Mahad Building Collapse Updates: एकाचा मृत्यू,8 जणांना वाचवण्यात यश; 43 जणांचा शोध घेण्याचे काम सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 10:54 PM2020-08-24T22:54:17+5:302020-08-24T23:44:34+5:30
Mahad Building Collapse Updates: महाड तारिक गार्डन इमारतीमध्ये 119 नागरिक राहत होते. त्यापैकी 68 नागरिक इमारत पडण्याआधी बाहेर पडले होते.
महाड शहरातील काजळपुरा परिसरात निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. ही दुर्घटना आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून बचावकार्य सुरु झाले आहे. कोसळलेल्या इमारतीचा मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे.
महाड तारिक गार्डन इमारतीमध्ये 119 नागरिक राहत होते. त्यापैकी 68 नागरिक इमारत पडण्याआधी बाहेर पडले होते. उर्वरीत 51 नागरिकांपैकी 8 जणांना बचाव पथकाने बाहेर काढले आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर आणि सहा जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशी, माहिती निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी दिली. अन्य 43 जणांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
महाड शहरातील हापुस तलावाजवळ तारीक गार्डन ही इमारत उभारण्यात आली हाेती. इमारतीचे दाेन पिलर कमकुवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या इमारतीमध्ये 47 फ्लॅट असल्याचे बाेलले जातय. या ठिकाणी सुमारे 200 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने मदत कार्य सुरु केले आहे.
Today at about 1850 hrs, A G+4 building collapsed in Kajalpura area of Mahad Tehsil in Dist. Raigad, Maharashtra.
— ANI (@ANI) August 24, 2020
About 50 people are feared to be trapped. 3 teams of 5 BN NDRF have moved: National Disaster Response Force (NDRF) pic.twitter.com/XlWegCSHqq
महाड येथील दुर्घटना व तेथील परिस्थितीबाबत आतापर्यंतचे अपडेट्स
- रायगड जिल्ह्यातील महाड येथील तारिकगार्डन नावाची पाच मजली इमारत कोसळून काही जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती.
- जिल्हा प्रशासनाची तात्काळ मदत व बचाव कार्यासाठी तत्परता.
- पुण्याहून एनडीआरएफची तीन पथके महाडकडे तातडीने रवाना
- माणगाव,पेण, तळा, पोलादपूर,पनवेल,रोहा,अलिबाग, खोपोली,मुरुड,सुधागड येथून गॅस कटर्स, ॲम्बुलन्स,जनरेटर, जेसीबी, डंपर,डॉक्टर्स, पोकलेन, पाणी,बिस्किट्स, तसेच मदत कार्यासाठी इतर आवश्यक साधन सामग्री मोठ्या प्रमाणावर तात्काळ पाठविण्यात आली आहे.
- एनडीआरएफच्या पथकांना घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था
- मेडिकल कॅम्प साठी नोडल ऑफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती
- जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी माणगावमधील राऊत हॉस्पिटल, निकम हॉस्पिटल, राठोड हॉस्पिटल, बेडेकर हॉस्पिटल, वक्रतुंड हॉस्पिटल, पटेल हॉस्पिटल, माळी हॉस्पिटल, यादव हॉस्पिटल, रानडे हॉस्पिटल, पाटणकर हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटल, कामेरकर हॉस्पिटल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय आणि महाड शहरातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसेकर हॉस्पिटल नांदगावकर हॉस्पिटल, म्हामुणकर हॉस्पिटल, डॉ. फैजल देशमुख हॉस्पिटल भूलतज्ञ, आर्थोपेडिक, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ यांच्यासह सज्ज.
- पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या समन्वयातून एमजीएम हॉस्पिटल कळंबोली, बेलापूर डी.वाय.पाटील हॉस्पिटल तसेच ज्युपिटर हॉस्पिटल आवश्यकता भासल्यास महाड दुर्घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी सज्ज.
- रोहा प्रांताधिकारीडॉ. यशवंत माने यांच्या समन्वयातून जिंदाल स्टील हॉस्पिटल महाड दुर्घटनेतील जखमींच्या उपचारार्थ सज्ज
- मदतीसाठी रिलायन्स नागोठणे, पोस्को कंपन्याही सरसावल्या पुढे
- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे महाड जवळील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ रक्तदानासाठी आवाहन
- सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावार यांच्याकडून उद्याच रक्तदान शिबिराचे आयोजन
- जिल्हाधिकाऱ्यांचे तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश
- आतापर्यंत आठ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले असून सात जण जखमी तर एकाचा मृत्यू.
- संपूर्ण परिस्थितीवर पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांचे संपूर्ण लक्ष. घटनास्थळावरील सर्व यंत्रणांशी समन्वय.
- पावसामुळे दुर्घटनास्थळी मदतकार्यात अडथळा. मात्र मदत व बचाव कार्य गतीने सुरू ठेवण्यास यंत्रणांचे शर्थीचे प्रयत्न.