महाड : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे महाड शहरात घुसले आहे. यामुळे शहरासह तालुक्यातील बिरवाडी, तसेच नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने महाड शहरालाच शनिवारी सकाळी पुराचा वेढा पडला.शहरातील दस्तुरी मार्ग, क्रांतिस्तंभ, भीमनगर, गांधारी नाका आदी सखल भागांसह अर्जुन भोईमार्ग आणि मुख्य बाजारपेठेत दोन ते तीन फूट पुराचे पाणी होते. बाजारपेठेत, तसेच अन्य ठिकाणी सामानाची आवराआवर करण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली होती.दुपारी दोन वाजेपर्यंत पुराचे पाणी जैसे थेच होते, तर संततधार सुरूच असल्याने पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काळ नदीचे पाणी बिरवाडीत शिरल्याने सखल भागाला पुराचा फटका बसला. पूरस्थितीमुळे दोन दिवस शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती. महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील व नगरपरिषद प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून होती. नगरपरिषदेतर्फे नागरिकांंच्या मदतीसाठी होड्या तैनात ठेवण्यात आल्या होत्या.अतिवृष्टीमुळे वाळण विभागातील मांघरुण वारंगी मार्गावर दरड कोसळल्याने पलीकडच्या गावांचा संपर्क तुटला. शिरगाव येथील रस्ता खचला, तर अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता, तर शहरातही शनिवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित होता.
महाडला पुराचा वेढा; संततधार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 11:37 PM