महाडमध्ये ठेविदारांची फसवणूक
By admin | Published: October 2, 2016 03:06 AM2016-10-02T03:06:19+5:302016-10-02T03:06:19+5:30
पंचवटी मल्टीस्टेट को. आॅप. क्रेडिट सोसायटी या गुंतवणूक कंपनीत एक वर्षासाठी ठेवलेल्या ठेवीची रक्कम एजंटस् परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या या कंपनीच्य तिघा एजंटस्
महाड : पंचवटी मल्टीस्टेट को. आॅप. क्रेडिट सोसायटी या गुंतवणूक कंपनीत एक वर्षासाठी ठेवलेल्या ठेवीची रक्कम एजंटस् परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या या कंपनीच्य तिघा एजंटस् विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील महाड ट्रेंड सेंटरच्या इमारतीत आॅस्कर इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या पश्चिम बंगालमधील गुंतवणूक कंपनीने महाड पोलादपूर माणगाव तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना करोडो रूपयांचा चूना लावून गाशा गुंडाळून पसार झाल्यानंतर त्याच ठिकाणी पंचवटी मल्टीस्टेट या गुंतवणूक कंपनीने आपले बस्तान बसवले होते. मात्र या सोसायटीत बिरवाडी येथील प्रभावती स्वाही व क्षुभना स्वाही या दोन ठेविदारांनी ५ लाख व ८ लाख ५० हजार रूपयांची ठेव एक वर्षांसाठी ११ टक्के व्याजदराने ठेवली होती.
मात्र मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर या ठेवीची व्याजासह होणारी १४ लाख ९८ हजार ५०० रूपयांची रक्कम परत न दिल्याने पंचवटी सोसायटीचे संपत झांजे (नांगलवाडा), विनोद पवार (कुसगाव) व प्रेमानंद ब्यारी (रा. बँगलोर) या तिघा एजंटस्वर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक स्वाही यांनी याबाबत आपल्या आईची व बहिणीची आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती. पो.नि. नंदकुमार सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
(वार्ताहर)