महाडची ग्रामदेवता जाखमाता देवी
By admin | Published: October 22, 2015 12:08 AM2015-10-22T00:08:30+5:302015-10-22T00:08:30+5:30
पुरातन काळापासून ते शिवकाळापर्यंत महाडची ग्रामदेवता जाखमातेच्या अस्तित्वाच्या खुणा आजही महाडमध्ये आढळतात. खरेतर कोकणात अनेक ठिकाणी जाखमाता देवीची
महाड : पुरातन काळापासून ते शिवकाळापर्यंत महाडची ग्रामदेवता जाखमातेच्या अस्तित्वाच्या खुणा आजही महाडमध्ये आढळतात. खरेतर कोकणात अनेक ठिकाणी जाखमाता देवीची मंदिरेही आहेत. जाखडी या कोकणातील पारंपरिक नृत्यकलेच्या नावाशी साधर्म्य असलेला जखडणे या शब्दाच्या उत्पत्तीतून जाखमाता हा शब्द आलेला आहे. त्यामुळे भक्तांशी घट्ट नाते सांगणारी देवी असा तर्क काढला जातो. आजही या जाखमाता देवीचे महात्म्य भक्तांच्या श्रद्धेमुळे अधोरेखित झालेला आहे.
महाडमधील हे जाखमातेचं पाषाणरूपी देवस्थान महाडच्या इतिहासकालीन कोट किल्ल्याच्या पूर्वच्या द्वारापाशी आहे. हेमाडपंथीय बांधकाम असलेल्या या छोट्याशा मंदिराभोवती सभामंडप घातल्यामुळे या मंदिराचे भव्य स्वरूप दिसते. जाखमाता हे यक्षिणीचा अवतार असल्याने व्यापारीवर्गाची ही देवी, असेही तिला संबोधले जाते. महाडच्या प्रसिद्ध छबिना उत्सवाची सुरुवात जाखमाता देवीच्या पालखीशिवाय होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही काळ संभाव्य वास्तव्य असलेल्या कोट किल्ल्याची रक्षणकर्ती म्हणून या जाखमाता देवीकडे पाहिले जाते. तिच्या हातात ढाल व तलवार आहे. देवीचे मोठे डोळे व शांत, तेजलदार चेहरा असं हे रूप भक्तांना भावतं. (वार्ताहर)
रेडा कापण्याची प्रथा बंद
पूर्वीच्या काळी या देवीसमोर रेडा कापण्याची प्रथा होती. मात्र ही प्रथा बंद करावी, अशी मागणीवजा विनंती करवा या व्यापारी कुटुंबातील एका महिलेने ग्रामस्थांकडे केली. ही पूर्वापार प्रथा बंद केल्यास आपण देवीचे मंदिर बांधून देऊ, असे या करवा कुटंबातील महिलेने ग्रामस्थांना सुचवले. हा एक सामाजिक विचार मान्य केला आणि रेडा कापण्याची अघोरी प्रथा बंद करण्यात आली.