महाडचा मराठमोळा जवान भोपाळ बचावकार्यात शहीद, गावावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 05:22 PM2018-05-16T17:22:39+5:302018-05-16T17:25:26+5:30
भोपाळमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानंतर बचावकार्य करताना अचानक झालेल्या स्फोटात गंभीररीत्या जखमी झालेल्या भारतीय सैन्य दलातील प्रथमेश दिलीप कदम हा २६ वर्षीय जवान शहीद झाला
संदिप जाधव
महाड - भोपाळमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानंतर बचावकार्य करताना अचानक झालेल्या स्फोटात गंभीररीत्या जखमी झालेल्या भारतीय सैन्य दलातील प्रथमेश दिलीप कदम हा २६ वर्षीय जवान शहीद झाला. शहिद प्रथमेश याचे महाड तालुक्यातील शेवते हे मुळ गाव असून या गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारी १२ मे ला भोपाळ येथे घडलेल्या रेल्वेच्या अपघातानंतर बचावकार्य करणाऱ्या सैन्य दलाच्या पथकात प्रथमेश कार्यरत असतानाच रेल्वेमध्ये अचानक स्फोट झाला. त्यावेळी गंभिररित्या जखमी झालेल्या प्रथमेशवर दिल्लीतील सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार सुरु असताना काल मंगळवारी सकाळी१०.३० वा त्याचे निधन झाले. काल रात्री याबाबतची माहिती शेवते गावात समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे.प्रथमेश च्या पश्चात आई,वडील व एक विवाहित बहिण आहे.
सैनिकी परंपरा असलेल्या या गावातील प्रथमेश कदम याच्या कुटुंबाची चौथी पिढी सध्या भारतीय सैन्याच्या सेवेत असून आठ वर्षापूर्वी प्रथमेश सैन्यात दाखल झाला होता. प्रथमेश हा सध्या भोपाळ येथे सैन्य दलाच्या इएमइमध्ये कार्यरत होता.प्रथमेश याचे वडील दिलीप कदम हे नाशिक मधील एका खाजगी रूग्णालयात काम करतात. गेल्या काही वर्षांपासून कदम कुटुंबाचे वास्तव्य नाशिक मध्येच आहे. नाशिक येथेच बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या प्रथमेश याला सैन्यात अधिकारी व्हायची खुप इच्छा होती असे प्रथमेश याचे चुलते सुभाष कदम यांनी सांगितले.मात्र त्याची अधिकारी व्हायची इच्छा अपुरी राहिली असे सांगताना कदम यांना अश्रु अनावर झाले. प्रथमेश याचे शव दिल्ली येथून आज रात्री उशिरा खास विमानाने मुंबई मध्ये आणण्यात येणार असून गुरुवारी सकाळी शेवते गावात शहीद प्रथमेशवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.प्रथमेश याचे वडील दिलीप कदम व त्याची आई प्रतिभा कदम हे दिल्ली येथे रवाना झाले आहेत.
प्रथमेश सैन्यात असला तरी गणपती तसेच सणासुदीला तो शेवते गावात नेहमी यायचा. आकर्षक व्यक्तीमत्व लाभलेला प्रथमेश गावातील सर्वांशी मिळून मिसळून वागायचा.त्याच्या या स्वभावामुळे प्रथमेश शेवते या गावात सर्वांचा आवडता होता. मात्र प्रथमेश च्या दुदैवी निधनाने संपूर्ण गावावरच दु:खाचा डोंगर कोसळल्याची भावना प्रथमेश याच्या गावातील मित्रांनी व्यक्त केल्या.
आज दुपारी महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार, निवासी नायब तहसीलदार दिपक कुडाळ यांनी शेवते गावात जाऊन कदम कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.