एमआयडीसीविरोधात धाटावमध्ये महामोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:18 AM2019-01-25T00:18:24+5:302019-01-25T00:18:30+5:30
धाटाव एमआयडीसीत स्थानिकांना नोकरी मिळालीच पाहिजे, मुलींना नोकरीत आरक्षण द्या, प्रदूषणावर नियंत्रण आलेच पाहिजे आदी मागण्यांसाठी धाटाव एमआयडीसीविरोधातील बहुजन समाजाने गुरुवारी मोर्चा काढला होता.
रोहा : धाटाव एमआयडीसीत स्थानिकांना नोकरी मिळालीच पाहिजे, मुलींना नोकरीत आरक्षण द्या, प्रदूषणावर नियंत्रण आलेच पाहिजे आदी मागण्यांसाठी धाटाव एमआयडीसीविरोधातील बहुजन समाजाने गुरुवारी मोर्चा काढला होता. डीएमसी कंपनीच्या गेटसमोरून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर महारॅली काढून मोर्चा सुदर्शनमार्गे रोहा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात धाटाव, वरसे विभागातील हजारो नागरिक, सहभागी झाले होते. यात तरुणांची संख्याही मोठी होती. मोर्चात कोणत्याही लोकप्रतिनिधींचा सहभाग नव्हता.
धाटाव पंचक्र ोशीत बहुजन समाज आयोजित धाटाव एमआयडीसीविरोधातील मोर्चाचे नेतृत्त बहुजन समाज बांधवांनी केले. या वेळी सुरेश मगर, ज्ञानेश्वर साळुंखे, अमित घाग, लीलाधर मोरे, शंकर भगत यांनी संबोधित केले. त्यानंतर हजारो तरुणांनी दुचाकी रॅली काढून जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.
तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर, पोलीस आवाराबाहेर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चाचे नेतृत्त्व करणारे सुरेश मगर यांनी, एमआयडीसी, एमपीसीबी, स्थानिक प्रशासन यांसह राजकीय नेत्यांचा समाचार घेतला. आता मागण्यांचे बॅनर्स उभारले आहेत. मात्र, तरीही मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा या वेळी मगर यांनी दिला.
>मूलभूत सुविधांबरोबरच दूषित पाण्याचा प्रश्न
एमआयडीसी होऊन जवळपास ५० वर्षे झाली आहेत. मात्र, अद्याप परिसराचा विकास झालेला नाही. या ठिकाणी मुबलक पाणी नाही, अद्ययावत रुग्णालय नाही, मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या वेळी बाटलीबंद दूषित पाणी प्रांताधिकारी व एसपीसीबीच्या अधिकाऱ्यांना दाखवण्यात आले. यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.