महाड बाजारपेठेवर ऐन गणेशोत्सवात मंदीचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:05 AM2019-09-04T01:05:01+5:302019-09-04T01:05:17+5:30
यंदा महाड शहरासह संपूर्ण तालुक्यात पुराने हाहाकार माजवला. घरे तसेच दुकानदारांचे या पुराने कंबरडेच मोडले होते.
सिकंदर अनवारे
दासगाव : संपूर्ण देशभरात मंदीचे सावट असताना गणपती सणानिमित्त गजबजणाऱ्या महाडमध्येही छोट्या दुकानदारांपासून मोठ्या दुकानदारांपर्यंत सर्वांना मंदीची झळ बसली आहे. सणासुदीच्या दिवसांतही हे सर्व जण हातावर हात ठेवून बसलेले आहेत.
देशात जाणवणाºया आर्थिक मंदीचा फटका आता सर्वसामान्य विक्रेत्यांनाही जाणवू लागला आहे. कोकणातील गणेशोत्सवात गणेशोत्सवापूर्वी बाजारपेठा खरेदीसाठी हाउसफुल्ल होत असत. मात्र, या वर्षी चित्र उलटे पाहण्यास मिळाले.
यंदा महाड शहरासह संपूर्ण तालुक्यात पुराने हाहाकार माजवला. घरे तसेच दुकानदारांचे या पुराने कंबरडेच मोडले होते. पुरानंतर काही दिवसांतच गणेशोत्सव हा सण येणार असल्याने पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई या कालावधीत होईल, अशी आस लावून बसलेले छोटे-मोठे दुकानदार तसेच व्यापारी, चांदी-सोन्याचे दुकानदार आणि वाहनांचे शोरूम यांची मोठी निराशा या मंदीमुळे झाली आहे. आज सर्व बाजारपेठेतील परिस्थिती पहिली तर जी गर्दी उत्सव काळात पाहिजे ती नसल्याची खंत व्यापारी, दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. दुकानदारांनीही पूरपरिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे दुकानात सणासुदीसाठी लागणारा माल भरून ठेवला नाही. अगदी गणेशोत्सव तोंडावर असतानाच दुकाने विविध सजावटीच्या, पूजेच्या साहित्याने गजबजू लागली होती. मात्र, पावसाची संततधार आणि मंदीचे सावट यामुळे ऐन गणेशोत्सवात चैनीच्या वस्तू खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. यामुळे विद्युत उपकरणे, घरगुती उपकरणे, मोबाइल विक्रेते, वाहन विके्रते आदी वस्तू खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
गणेशोत्सव काळात दागदागिने आणि विशेष करून गणरायाच्या सजावटीसाठी, पूजेसाठी विविध चांदीचे दागिने खरेदी केले जातात. यामध्ये चांदीचा मोदक, चांदीच्या दूर्वा, जास्वंद फूल, उंदीर, पान आदी चांदीच्या वस्तू उपलब्ध आहेत. मात्र, या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यातच सोने आणि चांदीचे दरदेखील वाढल्याने चांदीच्या दागिन्यांची मागणी घटली असल्याचे सोने-चांदीचे विक्रेते सांगत आहेत. याप्रमाणेच ऐन सणासुदीच्या काळात वाहन खरेदी करण्याकडे कल असतो. मात्र, या गणेशोत्सव काळात मंदीचे सावट असल्याने वाहन खरेदीही मंदावली आहे. ज्या ठिकाणी गणेशोत्सव काळात दुचाकी आणि चारचाकीची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जायची तेथे या वेळेला एक आणि दोन वाहने बुक झाल्याचे सांगण्यात आले आहे.
महाडमधील पूरपरिस्थिती आणि चांदीचे वाढलेले दर त्यातच आर्थिक मंदी यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. यामुळे नियमित खरेदीवर जवळपास ३० ते ४० टक्के परिणाम झाला आहे. तर गणेशाच्या पूजेसाठी असलेली चांदीच्या दागिन्यांची मागणीही घटली आहे.
- उमेश जैन,
ज्वेलर्स, महाड
पुरानंतर गणेशोत्सव आला. मात्र, अनेक ठिकाणाहून पाहिजे त्या प्रमाणात माल येत नाही. सांगली, कोल्हापूरमधील पुरामुळे या भागातून येणारा कापूर, अगरबत्ती यांचा पुरवठा मंदावला आहे. पूर, त्यानंतर आलेली मंदी आदी कारणामुळे नियोजन करता आले नाही.
- भगवती कलाल,
अगरबत्ती व्यापारी, महाड
गणेशोत्सवात दुचाकींची मागणी होईल, यामुळे कर्ज काढून वाहने मागवली. मात्र, एकही दुचाकी बुक झाली नाही. हीच अवस्था सर्व विक्रेत्यांची झाली आहे. वाहन विक्री आलेल्या किमतीत करण्याची पाळी येऊन ठेपली आहे.
- बिपीन ओलीवाला,
दुचाकी विक्रे ता