महाड मतदारसंघात दुरंगी लढत; अटीतटीचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 01:55 AM2019-09-06T01:55:54+5:302019-09-06T01:56:04+5:30

दोन्ही दिग्जांमधील स्पर्धा कायम : भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

Maharad constituency running contested; Conditional match | महाड मतदारसंघात दुरंगी लढत; अटीतटीचा सामना

महाड मतदारसंघात दुरंगी लढत; अटीतटीचा सामना

Next

दासगाव : महाड मतदारसंघात गेली अनेक वर्षे दुरंगी लढतीची स्पर्धा कायम टिकून राहिली आहे. पर्याय उपलब्ध न होणे किंवा उपलब्ध न करून देणे हे तत्त्व दोन्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काटेकोर पाळल्याने यावर्षी तरी ही निवडणूक पुन्हा शिवसेना आणि काँग्रेसमध्येच अटीतटीची होणार आहे.

महाड विधानसभा मतदारसंघ क्रमांक १९४ मध्ये गेली दहा वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचा पराभव राष्ट्रवादीचे माणिकराव जगताप यांनी केला. महाडच्या राजकीय इतिहासात हा पराभव महत्त्वाचा मानला गेला. शिवसेनेची ताकद वाढत असतानाच शिवसेनेला पराभव पत्करावा लागला याचे आत्मचिंतन शिवसेनेला करावे लागले होते. या विजयाने मात्र महाड तालुक्यात विकासाला चालना देण्याचे काम माणिकराव जगताप यांनी केले. मात्र, त्यांनाही अवघ्या पाच वर्षांतच पराभवाला सामोरे जावे लागले. महाडमधील जनता सुज्ञ आहे असे प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता सांगतो, त्याची प्रचितीही त्यांना येते हे विशेष. २००४ मध्ये प्रभाकर मोरे यांचा पराभव माणिकराव जगताप यांनी अवघ्या साडेतीन हजार ७७९ मतांनी केला. तर २००९ मध्ये भरत गोगावले यांनी तब्बल १४,९६० मतांनी प्रभाकर मोरे यांच्या पराभवाचा वचपा काढला. या मतदारसंघावर असलेले शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. हेच वर्चस्व २०१४ मध्येही कायम राहिले. २०१४ च्या निवडणुकीत माणिकराव जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महाडमध्ये स्वतंत्र निवडणूक लढली आणि माणिकराव जगताप यांना २०१४ मध्येही पराभव पत्करावा लागला. या वेळी २१,२५६ मतांची आघाडी भरत गोगावले यांना मिळाली.

आज देशभरात भाजप-शिवसेनेचे वारे सुरू आहेत. महाड मतदारसंघात भाजप वाढीची सुरुवात असली तरी आजदेखील प्रतिसाद लाभलेला नाही. एकीकडे भाजपमध्ये जुना-नवा वाद कायम असल्याने एकमत होत नसल्याचे चिन्ह दिसून येत आहे. तर दुसरीकडे अन्य पर्यायी पक्षदेखील प्रबळ नसल्याचे दिसून येत आहे. महाडमध्ये १९९८ पासून सेना-काँग्रेस हेच लढतीचे गणित राहिले आहे. शिवसेना-भाजप युती होईल यात शंकाच नाही. एकमेकांवर अवलंबून असलेले हे पक्ष सत्तेसाठी एक होतील. मात्र, महाडमध्ये शिवसेनेतील नाराज नेतेच भाजपमध्ये जाऊन बसल्याने युती झाल्यानंतर ते शिवसेनेचे किती काम करतात हे येणारा काळच ठरवणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही हीच अवस्था आहे. माणिकराव जगताप हे राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये गेले. मात्र, काही जणांनी राष्ट्रवादी सोडली नाही. उलट कार्यकर्ते खा. सुनील तटकरे यांच्याबरोबरच राहिले. यामुळे मधल्या काळात या दोन्ही नेत्यांत कायम वादाची ठिणगी पडत होती. आज दोन्ही नेत्यांत सख्य झाले आहे. या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना विजयी करण्यासाठी माणिकराव जगताप यांनी मेहनत घेतली. मात्र, या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मात्र दुखावले गेले आहेत. यातील काहींनी शिवसेनेत प्रवेश केला तर काही जण राष्ट्रवादीतच राहून आपली नाराजी व्यक्त करतील, अशी शक्यता आहे.

महाड, पोलादपूर शिवसेनेचे बालेकिल्ले
महाड, पोलादपूर हे दोन्ही तालुके शिवसेनेचे बालेकिल्ले राहिले आहेत. मात्र, याच बालेकिल्ल्यात माणिकराव जगताप आपले स्थान कायम ठेवून आहेत. २००४ मध्ये त्यांच्या काळात त्यांनी आणलेले प्रकल्प विकासाला चालना देणारे होते. आजही त्यांचा मतदार कायम आहे. यामुळे शिवसेनेला आजदेखील महाड नगरपालिकेवर विजय संपादन करता आला नाही. महाड मतदारसंघातील गेल्या दहा वर्षांचे वर्चस्व तोडण्यासाठी माणिक जगतापही सक्रिय झाले आहेत. पक्षातील कार्यकर्त्यांच्या भेटी, मोठ्या शहरातील मेळावे यावर त्यांनी भर दिला आहे. यामुळे ही निवडणूक महाडमध्ये अटीतटीची होणार आहे. महाड विधानसभा मतदारसंघात माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांचा मतदार त्यांच्याबरोबर ठाम राहिला आहे. त्याचबरोबर भरत गोगावले यांचा स्थानिक पातळीवर असलेला दांडगा जनसंपर्क, आपुलकी आणि मतदारांचा थेट संपर्क यामुळे शिवसेनेचे वर्चस्व प्रबळ झाले आहे. या मतदारसंघात अन्य प्रादेशिक पक्षदेखील निवडणुका लढवण्यासाठी उमेदवार उभे करतात. यामुळे नोटा आणि या उमेदवारांचे मतदान असे मिळून जवळपास दहा हजारांचा फरक निर्माण होतो. असे असले तरी यावर्षीही शिवसेनेचे भरत गोगावले आणि माणिकराव जगताप यांच्यातच थेट लढत होणार असल्याने या दुरंगी लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अनेक प्रश्न प्रलंबित
महाड मतदारसंघ हा महाड-पोलादपूर आणि माणगावचा काही भाग अशा पद्धतीने तयार झाला आहे. एकंदरच पाहता या विधानसभा मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्र मोठे आहे. या ठिकाणी ग्रामीण भागाचा विस्तार मोठा आहे. शिवाय ऐतिहासिक स्थळांचा समावेश अधिक आहे. जाणता राजा छ. शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील आमदार म्हणून वावरताना एक वेगळाच अनुभव आहे. या महापुरुषांच्या कर्मभूमीत काम करताना डोळ्यात एक वेगळी दृष्टी असेल तर विकासकामे आणि एक वेगळा मतदारसंघ म्हणून काम करता येणे शक्य आहे. या ठिकाणी सद्यस्थितीत प्रलंबित जलसिंचन प्रकल्प, अतिरिक्त औद्योगिक वसाहतीचा खुंटलेला विकास, शैक्षणिक साधनांचा अभाव, कृषिपूरक प्रकल्पांचा अभाव, असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. गावागावांत रस्ते झाले, पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या, या दैनंदिन निगडित योजना पूर्ण झाल्या असल्या तरी मानवी जीवनाचा विकास ज्या प्रकल्पांनी होणार आहे, ते प्रकल्प प्रलंबित राहिले आहेत.

Web Title: Maharad constituency running contested; Conditional match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.