Raigad: शेकापच्या चित्रलेखा पाटील सायकल चालवत पोहचल्या उमेदवारी अर्ज भरायला
By राजेश भोस्तेकर | Updated: October 24, 2024 14:23 IST2024-10-24T14:21:31+5:302024-10-24T14:23:09+5:30
Maharashtra Assembly Election 2024: अलिबाग विधानसभा मतदार संघातून जनताच मला मतपेटीतून कौल देईल असा विजयाचा आशावाद शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला आहे.

Raigad: शेकापच्या चित्रलेखा पाटील सायकल चालवत पोहचल्या उमेदवारी अर्ज भरायला
- राजेश भोस्तेकर
अलिबाग - सायकलींचे चाक हे नेहमीच आपल्याला पुढे नेत असते. प्रगतीचे, बदलाचे, विकासाचे आणि शेकापच्या सायकलचे हे चाक आहे. सायकलीवाली ताई म्हणून विकासाचे चाक घेऊन पुढे जात आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघातुन भरत असलेला उमेदवारी अर्ज हा सुशिक्षित, गोरगरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांच्या विकासासाठी, शिक्षणाला प्रगतीवर नेणारा आणि मुली, महिला यांच्यासाठी आशावादी असणारा आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघातून जनताच मला मतपेटीतून कौल देईल असा विजयाचा आशावाद शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला आहे.
अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघातून शेकापतर्फे चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी पक्षाने दिली आहे. गुरुवारी २२ ऑक्टोंबर रोजी सायकल चालवून मोजक्याच शेकापच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबतीने प्रांताधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यानंतर त्यांनी विजयाची खात्री असल्याचे म्हटले आहे.
चित्रलेखा पाटील यांनी कुलदैवत दर्शन घेऊन शेतकरी भवन येथे दाखल झाल्या. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर पाटील या अर्ज भरण्यास गेल्या. अरुण कुमार वैद्य शाळेपासून पाटील या आपल्या सहकारी महिला सोबत सायकलवर बसून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाल्या. अर्ज भरताना उमेदवार आणि चार प्रतिनिधी यांच्या उपस्थिती पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे.
चित्रलेखा पाटील यांची अलिबाग मतदारसंघात सायकली वाली ताई म्हणून ओळख निर्माण झाली आहे. पाटील यांनी जिल्ह्यात २२ हजार सायकली ह्या मुलींना गावोगावी वाटल्या आहेत. त्यामुळे या सायकलिवर बसून गाव खेड्यातील मुली शाळेत जात आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायला जाताना चित्रलेखा या सायकलवरून गेल्या होत्या. यावेळी पक्षाच्या नेत्या ऍड मानसी म्हात्रे, नागाव सरपंच हर्षदा मयेकर यासह महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.