रायगडमध्ये दोन्हीकडे बंडखोरी; नेमका फायदा कुणाला होणार? विद्यमान आमदार वर्चस्व कायम राखणार की मविआ धोबीपछाड देणार?
By राजेश भोस्तेकर | Published: November 8, 2024 06:25 AM2024-11-08T06:25:48+5:302024-11-08T06:26:39+5:30
Maharashtra Assembly Election 2024: रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांत सत्ताधारी पक्षांचे आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, महाविकास आघाडीने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.
- राजेश भोस्तेकर
रायगड - रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांत सत्ताधारी पक्षांचे आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, महाविकास आघाडीने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. पेण, उरण, पनवेलमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी झाली झाली आहे. तर, अलिबाग, कर्जत मतदारसंघात महायुतीत बंडाळी आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आपले वर्चस्व कायम राखतात की, महाविकास आघाडी त्यांना धोबीपछाड देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, कर्जत, उरण आणि पनवेल हे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. सातही ठिकाणचे आमदार सत्ताधारी पक्षांत असून, शिंदेसेना ३, भाजप २, अजित पवार गट १ आणि १ अपक्ष आमदार असून, तो सध्या भाजपमध्ये आहे. त्यामुळे महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. उद्धवसेनेचे पेण, उरण, कर्जत, पनवेल आणि महाड या मतदारसंघांत उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेकापकडून उमेदवारी मिळाल्याचा दावा अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण या मतदारसंघांतील उमेदवार करत आहेत.
शेकाप आणि उद्धवसेना यांच्यात समेट झाली असला तरी अलिबाग वगळता पेण, पनवेलमध्ये उद्धवसेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत. तर, शेकापने उरणमधून अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीत तणाव निर्माण झालेला आहे.
अलिबागमध्ये बंडखोर अपक्ष उमेदवाराने महायुतीच्या उमेदवारांसमोर आव्हान निर्माण केले आहे. कर्जत मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने महायुती उमेदवारासमोर आव्हान निर्माण केलेले आहे. त्यामुळे महायुती असो वा महाविकास आघाडी दोन्हींमध्ये बंडखोरी झाली असल्याने कोण विजयी होणार आणि कोण चारीमुंड्या चीत होणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर आहे. पर्यटन जिल्हा अशी ओळख असली तरी येथे हा प्रश्न सोडविण्यासाठी फार प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.
- पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. त्यामुळे अधिक उपचारासाठी रुग्णांना नवी मुंबई, मुंबईत जावे लागते. अपघातग्रस्तांवर उपचारासाठीही आधुनिक रुग्णालये नाहीत. ही येथील शोकांतिका आहे.
- जिल्ह्यात औद्योगिकीकरण झाले असले तरी नोकरीसाठी येथील नागरिकांना मुंबई, पुणे या शहरात धाव घ्यावी लागते. पर्यटन, शेतीवर आधारित व्यवसायनिर्मिती करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे.