रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 11:55 PM2019-05-01T23:55:30+5:302019-05-01T23:56:01+5:30

नागरिकांची मोठ्या संख्येने हजेरी : पोलीस परेड मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Maharashtra Day celebrations in Raigad district | रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Next

अलिबाग : आगरी, कोळी, आदिवासी समाज यांनी येथील सांस्कृतिक परंपरा आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे. विविध जाती-धर्माचे नागरिक येथे सलोख्याने आणि शांततामय वातावरणात राहतात. हेच रायगड जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. चव्हाण यांनी या वेळी जागतिक कामगार दिनाच्या कामगारवर्गाला शुभेच्छाही दिल्या.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी सकाळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान येथे ध्वजारोहण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला रायगड किल्ला याच जिल्ह्यात आहे. केवळ गड-किल्ले नाही, तर या जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिले आहे. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारे, बहरलेली जंगले, नयनरम्य धबधबे, थंड हवेची ठिकाणे, प्राचीन धार्मिक स्थळे, यामुळे ही भूमी खऱ्या अर्थाने कोकणचीच राजधानी म्हटले तर वावगे ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेला चवदार तळ्याचा ऐतिहासिक लढा म्हणजे या भूमीतून झालेली सामाजिक न्यायाची अभूतपूर्व क्रांती होती. कान्होजी आंग्रे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, महान विचारवंत विनोबा भावे, सी.डी. देशमुख यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे, असेही ते म्हणाले. ध्वजारोहणानंतर चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, कर्मचारी यांची भेट घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयातही ध्वजारोहण
तत्पूर्वी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथेदेखील जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Day celebrations in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.