अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये ३४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ७८ उमेदवार निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावणार आहेत. पाच विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी विरोधात युती असाच सामान पहायला मिळणार आहे.उरणमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांच्यामुळे युतीच्या उमेदवाराला तर, अलिबागमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी आघाडीच्या उमेदवारासमोर आव्हान उभे केले आहे.सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रामुख्याने अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सातही विधानसभा निवडणुकीतील लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. उरणमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्यासमोर शेकापचे विविक पाटील यांचे आव्हान असतानाच युतीमधील भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.तशीच परिस्थीती अलिबागमध्ये असून काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेले राजेंद्र ठाकूर यांच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे राजेंद्र ठाकूर हे त्यांच्या वहिनी श्रध्दा ठाकूर यांच्या विरोधातच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे काँग्रेसच्याच मतांचे विभाजन होणार असल्याचे सांगितले जाते आहे.कर्जत, पनवेल, पेण, महाड आणि श्रीवर्धन या पाच ठिकाणी आघाडी विरोधात युती अशी सरळ लढत होणार आहे. त्यामध्ये कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड यांच्या विरोधात शिवसेनेचे महेंद्र थोरवे, पनवेल भाजपचे प्रशांत ठाकूर विरोधात शेकापचे हरेश केणी, पेण येथे भाजपचे रविंद्र पाटील विरोधात शेकापचे धैर्यशिल पाटील, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले यांचा सामना काँग्रेसचे माणिक जगताप आणि श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे विनोद घोसाळकर अशी लढत होणार आहे. मात्र, जिल्ह्यात वंचीत बहुजन आघाडी आणि मनसे यांची ताकद तुलनेने कमी असल्याने त्याचा विशेष प्रभाव पडेल असे सध्यातरी दिसून येत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.सर्वात कमी/जास्त उमेदवारमहाड आणि उरण मतदारसंघात प्रत्येकी आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर सर्वाधिक जास्त १४ उमेदवार हे प्रत्येकी पेण आणि श्रीवर्धन या मतदारसंघात आहेत.
Maharashtra Election 2019: रायगडमध्ये ७८ उमेदवार आजमावणार नशीब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 2:30 AM