दासगाव : १९४ महाड विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी बाजी मारली आहे. सलग तीन वेळा निवडून येऊन भरत गोगावले यांनी हॅट्ट्रिक साधून पुन्हा एकदा महाड मतदारसंघात भगवा फडकवला आहे. महाड मतदारसंघात एक लाखाच्या वर मते प्राप्त करून या मतदारसंघात लाख मते घेऊन विजयी होणारे पहिले उमेदवार ठरले आहेत. या वेळी महाड शहरातून शिवसैनिकांनी भव्य विजयी मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला.
संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले यांनी बाजी मारली आहे. विजयाची हॅट्ट्रिक साधत भरत गोगावले २१ हजार २५६ मतांनी विजयी झाले आहेत. सुरुवातीच्या पहिल्या फेरीत अवघ्या १४ मतांची आघाडी गोगावले यांनी घेतली. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये भरत गोगावले यांनी आघाडी घेत विजय प्राप्त केला. महाड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. या वेळी प्रथम पोस्टल मतदानाची मोजणी घेण्यात आली.
मागील विजयाशी आकडा मिळता जुळताशिवसेना उमेदवार भरत गोगावले हे तिसऱ्यांदा विजयी झाले असून, सन २००९ मध्ये भरत गोगावले हे १४,०५० मतांनी तर २०१४ मध्ये २१,२५८ मतांनी विजयी झाले होते. हॅट्ट्रिक साधतानाही गोगावले यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आकडा मिळता जुळता केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महाड विधानसभा मतदारसंघात माणिक जगताप काँग्रेसचे मतदान कायम ठेवण्यात यशस्वी झाले.
माणिक जगताप यांना सन २००९ मध्ये ७१,६००, २०१४ मध्ये ७३,१५२ आणि या विधानसभा निवडणुकीत ८०,११४ मते प्राप्त केली आहेत. यामुळे माणिक जगताप यांनी आपला काँग्रेसचा मतदार ठाम ठेवला आहे. महाड विधानसभा मतदारसंघात मनसेने या वेळीही मतदार आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसेचे देवेंद्र गायकवाड यांना २,२२५ मते मिळाली. या वेळी अपक्ष उमेदवारांना मात्र डिपॉझिट शाबूत ठेवता आले नाही. अपक्ष उमेदवार चंद्रकांत धोंडगे हे किमान चार हजार मते घेतील, अशी आशा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात होती.
मात्र, चंद्रकांत धोंडगे यांना अवघी १,१९३ मते मिळाली. तर अशोक जंगले हे ५०० चा आकडाही पार करू शकले नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे संजय घाग दीड हजारांच्या पलीकडे गेले नाहीत.हा विजय जनतेला समर्पित - आमदार भरत गोगावले आमदार भरत गोगावले यांची विजयी मिरवणूक महाड शहरातून काढण्यात आली. या वेळी संपूर्ण महाड शहर घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेले. हा विजय सर्वसामान्य जनतेला समर्पित करीत असून, जनतेच्या सुख-दु:खात सहभागी झाल्यानेच एक लाखापेक्षा जास्त मतदानाचा टप्पा पार करता आला, यापुढेही जनतेची सेवा सुरूच ठेवणार असून प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यास कटिबद्ध असल्याचे गोगावले यांनी सांगितले.