दासगाव : १९४ महाड मतदारसंघात सोमवारी सकाळपासून मतदानास प्रारंभ होणार आहे, याकरिता प्रशासन सज्ज झाले असून या मतदान केंद्रावर कर्मचारी दाखल झाले आहेत. रविवारी सकाळपासूनच मतदान कर्मचारी त्यांना देण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर जाण्यास निघाले. सोमवारी सर्वत्र मतदान होणार असून १९४ महाड मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे.
महाड मतदारसंघात एकूण ३७९ मतदान केंद्र आहेत, याकरिता जवळपास १८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना रविवारी त्यांच्या मतदान केंद्रांवर सोडण्यात आले. महाड मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी याकरिता जय्यत तयारी केली आहे. सोमवारी सकाळीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या समोर वाहने उभी करण्यात आली होती. कर्मचारी, ईव्हीएम यंत्रे, व्हीव्हीपॅट यंत्र आणि अधिकारी यांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी ४३ बसेस, १६ मिनी बसेस, ९९ जीपची सुविधा करण्यात आली होती. त्यानुसार या मतदारसंघातील ३७९ मतदान केंद्रांवर कर्मचारी दाखल झाले आहेत. पहाटेपासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यामुळे एक दिवस आधीच मतदान केंद्रावर सुरक्षेची व्यवस्था आणि मतदानाची तयारी करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज व्यवस्था, दिव्यांगांना दिल्या जाणाºया सुविधा आदीबाबत मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तयारी केली आहे. महाड मतदारसंघात शिवसेना-भाजप युती, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, मनसे, वंचित बहुजनचे उमेदवार, भारत मुक्ती मोर्चा, अपक्ष तीन असे एकूण आठ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये युतीचे शिवसेनेचे उमेदवार आणि आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार या दोघांतच मुख्य लढत होणार आहे. या मतदारसंघात दुरंगी लढत होणार असल्याने सर्वांचेच लक्ष या लढतीकडे लागले आहे. या दोन्ही उमेदवारांनी गेला महिनाभर प्रचारासाठी मेहनत घेतली आहे. त्यांची मेहनत सोमवारी मतदानाच्या रूपाने ईव्हीएम यंत्रात नोंद होणार आहे.