- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकर सहा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकला आहे, तर एक विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे रोखण्यात यश मिळवले आहे. महायुतीच्या झंझावातापुढे शेकापचा सुपडा साफ झाला, तर जिल्ह्यात काँग्रेस औषधालाही उरलेली नसल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी, कर्जतमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे, पेण मतदारसंघातून भाजपचे रवींद्र पाटील, अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आणि श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे. राज्यात विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात चांगलेच वातावरण पेटवले होते. मात्र, मतदारांनी महायुतीच्याच बाजूने कौल दिला आहे. शेकापला या निवडणुकीत महायुतीने धूळ चारली आहे. त्यांनी उभा केलेला एकही उमेदवार निवडून आलेला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील शेकापच्या अस्तित्वावर आपोपच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्े आहे. शिवसेनेने अलिबागची जागा शेकापकडून, तर कर्जतची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिसकावली. महाडची जागा राखताना मात्र उरणची जागा गमावली आहे.
भाजपने पनवेलची जागा कायम ठेवतानाच पेणची जागा शेकापकडून घेतली आहे, तसेच उरणमधील शिवसेनेच्या ताब्यातील जागेवर भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी वर्चस्व मिळवत युतीलाच धक्का दिला आहे. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली जागा राखली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक नुकसान कोणाचे झाले असेल तर ते शेकापचे आहे. शेकापचे चारही उमेदवार पराभूत झाले आहेत. काँग्रेससाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ अशीच होती. मात्र, काँग्रेसने महाड वगळता कोणत्याच मतदारसंघात लक्षात राहील अशी कामगिरी केलेली दिसत नाही. जिल्ह्याला आता अलिबाग, उरण, पेण, कर्जत, श्रीवर्नधन या पाच मतदारसंघातून नवीन आमदार लाभले आहेत. तर पनवेल, महाडमध्ये मतदारांनी जुन्याच आमदारांना पुन्हा संधी दिल्याने भाजपचे प्रशांत ठाकूर आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांना हॅट्ट्रिक साधता आली आहे. जनतेने दिलेला कौल शेकापसह काँग्रेसनेही मान्य केला आहे. यापुढे शेकापला आणि काँग्रेसलाही पराभवाची कारणे शोधतानाच आत्मपरीक्षण करावे लागेल, एवढे मात्र निश्चित आहे.
राष्ट्रवादीकडे श्रीवर्धन; उरण अपक्षाकडे
श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे. तर उरण मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी निवडून आल्याने आता उरण मतदारसंघ अपक्षाकडे गेला आहे. राज्यात विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात चांगलेच वातावरण पेटवले होते. मात्र, मतदारांनी महायुतीच्याच बाजूने कौल दिल्याने रायगडमध्ये महायुतीने बाजी मारली आहे.