श्रीवर्धन : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वपक्षीय कार्यकर्ते जोरात कामाला लागल्याचे चित्र आहे. श्रीवर्धन प्रांताधिकाऱ्यांकडे शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे व काँग्रेसचे बंडखोर ज्ञानदेव पवार यांनी आपले अर्ज सादर केले आहेत.शिवसेना उमेदवार विनोद घोसाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, वरिष्ठ नेते व आजी-माजी आमदारांनी श्रीवर्धन प्रांतकार्यालय गजबजून गेले होते. शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांच्या अर्जाच्या वेळी माजी आमदार तथा नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले अवधूत तटकरे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, आमदारपदासाठी चर्चेत नाव असलेले अनिल नवगणे व भाजपकडून पाच वर्षे आमदारकीची स्वप्न रंगवणारे कृष्णा कोबनाक सर्व सोबत होते. गेल्या विधानसभेला अवघ्या ७२ मताने पराभूत झालेले रवि मुंडे तसेच म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव तालुक्यातील सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. नगरपालिका मैदानात स्थानिक नेत्यांनी भाषणे करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनी बहिणीच्या प्रचारासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रोहा, माणगाव, म्हसळा, तळा व श्रीवर्धन तालुक्यातील विविध भागातून पक्ष कार्यकर्ते श्रीवर्धनमध्ये हजर झाले होते, त्यामुळे श्रीवर्धन शहराच्या जसवली ते सोमजाई व मच्छी मार्के टपर्यंत सर्वत्र वाहनांनी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाकडून वाहतूककोंडीसाठी योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा अभाव निदर्शनास आला. सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर तालुक्यात कुठेही गैरकृत्य, वादविवादाची घटना घडली नाही.उरणमधून शेकापचे विवेक पाटील यांचा अर्जउरण : उरण मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे शेकाप उमेदवार विवेक पाटील यांनी मोठा गाजावाजा करून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी-काँग्रेसने या वेळी पाठ फिरवल्याने आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याची चर्चा उरण मतदारसंघात सुरू झाली आहे.गुरुवारी शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीच्या नावाखाली शेकापचे विवेक पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे उपस्थित होते. जासई फाटा येथून निवडणूक कार्यालयापर्यंत सकाळी १० वाजता मिरवणूकही काढण्यात आली. शक्तिप्रदर्शन करीत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीच्या एखाद्या झेंड्याचा अपवाद वगळता फारसे झेंडेही नजरेस पडले नाहीत. तसेच मित्रपक्ष व आघाडीचा एकही कार्यकर्ता मिरवणुकीत सहभागी झाला नाही.
Maharashtra Election 2019 : श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 2:43 AM