- विजय मांडे
कर्जत : कर्जत विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार असले तरी खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष - स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि समविचारी पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार आमदार सुरेश लाड आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष- रिपाइं -रासप - रयतक्रांती -शिवसंग्राम - महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये होणार आहे. गेल्या वेळीसुद्धा या दोघांमध्येच चुरशीची लढत झाली होती. या वेळीसुद्धा या दोघांमध्येच ‘बिग फाइट’ होणार आहे.
मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सुरेश लाड तीन वेळा आमदार झाले. १९९९ आणि २००९ साली ते सत्ताधारी पक्षाचे आमदार होते आणि त्या कालावधीत त्यांचे परममित्र सुनील तटकरे यांनी महत्त्वाच्या खात्याची मंत्रिपदे भूषविली होती. त्यामुळेच अनेक विकासकामे करून कर्जत शहराचा कायापालट होणे शक्य झाले. २०१४ साली लाड आमदार झाले; परंतु विरोधी पक्षाचे आमदार असल्याने निधी उपलब्धतेत अडचण आली आणि म्हणावी तशी विकासकामे झाली नाहीत. माथेरान नगरपालिकेतील सत्ता गेली. त्या पाठोपाठ कर्जत नगरपालिकेतील पंचवीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला. त्या निवडणुकीत लाड यांच्या कन्या प्रतीक्षा यांना पराभव पत्करावा लागला. मुलीचा पराभव लाड यांच्या चांगलाच जिव्हारी लागला मात्र लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या मतदारसंघातील आघाडी राखली. आताच्या निवडणुकीला सामोरे जाताना राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी पक्षांतर केले. आमदार लाडसुद्धा ‘शिवसेनेच्या वाटेवर’ अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या; परंतु ती केवळ अफवाच ठरली.
गेल्या वेळी शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या महेंद्र थोरवेंनी शेकापक्षाची उमेदवारी घेऊन तब्बल ५५ हजार मतांपेक्षा जास्त मते मिळविली. मात्र, थोड्याच दिवसांत त्यांनी पुन्हा शिवबंधन हाताला बांधले. त्यानंतर माथेरान, कर्जत नगरपरिषदेत सत्ता आणली. तसेच काही ग्रामपंचायतींतसुद्धा सत्ता आणली. त्यांनी चार-साडेचार वर्षे शिवसेना वाढविली. हे नाकारता येत नाही. मात्र, विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी शिवसेनेने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, त्या वेळी थोरवेंसह तब्बल आठ जणांनी मुलाखती देऊन इच्छा प्रगट केली. थोडीशी धुसफूस झाली. मात्र, महेंद्र थोरवेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. भारतीय जनता पक्ष, रिपाइं त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून प्रचार करीत आहेत.
प्रचाराच्या रणधुमाळीत महेंद्र थोरवे ‘अभी नही तो कभी नही’ या इराद्याने निवडणूक रिंगणात उतरले आहेत, तर कोणत्याही परिस्थितीत हट्ट्रिक साधायची यासाठी आमदार सुरेश लाड यांनी निवडणुकीत उडी घेतली आहे. गावागावांतील मतदारांच्या भेटी घेण्यावर दोन्ही उमेदवारांनी भर दिला आहे.शक्य नसेल तेथे त्या त्या भागातील प्रचाराची धुरा तेथील कार्यकर्ते सांभाळत आहेत. पक्षांतराचे पेव फुटलेले आहे.
जमेच्या बाजू
४०-४२ वर्षांची राजकीय कारकीर्द असून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सभापती ते आमदार असा प्रवास आहे. मितभाषी, वारकरी सांप्रदायाचे आहेत, त्यांचा मोठा लोकसंग्रह आहे. तीन वेळा आमदार, त्या कालावधीत केलेली मतदारसंघातील विकासकामे ही त्यांची मुख्य जमेची बाजू आहे. मागच्या निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार हनुमान पिंगळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश त्यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
चार-साडेचार वर्षे पक्ष संघटनेची मजबूत बांधणी महेंद्र थोरवे यांनी के ली आहे.भारतीय जनता पक्ष, रिपाइं, शिवसंग्राम, रासप, रयतक्रांती यांच्या भक्कम महायुतीमुळे सर्वच मतांचा फायदा होणार आहे. पुंडलिक पाटील, वसंत भोईर, पंढरीनाथ राऊत यांचा भाजपप्रवेश झाल्याने ताकद वाढली. आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा प्रचारात वापर, कर्जत, माथेरान नगरपरिषदेतील सत्ता हस्तगत, नेरळ ग्रामपंचायतीत पुन्हा सत्ता आली.
उणे बाजूशिवसेनेच्या वाटेवर असल्याची अफवा सुरेश लाड यांच्यासाठी धोक्याची ठरू शकते. कर्जत व माथेरान नगरपरिषदेतील सत्तेला सुरुंग, पक्षातील काही प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेना-भारतीय जनता पक्षात प्रवेश झाल्याने काही प्रमाणात मते कमी होऊ शकतात. मागील पाच वर्षे विरोधी पक्षाचे आमदार असल्याने त्यापूर्वीच्या कारकिर्दीच्या तुलनेत हवा तितका निधी उपलब्ध न झाल्याने विकासकामात अडचणी आल्या.
एखाद्या गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया व्यक्त करणे, मागील शिवसेनेचे उमेदवार हनुमंत पिंगळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे मतांचा फटका बसण्याची शक्यता. या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे देवेंद्र साटम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचा युतीच्या उमेदवाराच्या प्रचारीतील अनुपस्थितीचा फटका बसू शकतो.