Maharashtra Election 2019: रणरागिणींच्या लढतीकडे रायगड जिल्ह्याचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 05:10 AM2019-10-12T05:10:13+5:302019-10-12T05:10:53+5:30
श्रीवर्धन, अलिबाग, पेण या ठिकाणी राष्ट्रीय पक्षांनी महिला उमेदवारांना संधी दिली आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतील अलिबाग, श्रीवर्धन आणि पेण मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरत आहेत. या मतदारसंघांमध्ये महिला उमेदवारांपुढे बलाढ्य पुरुष उमेदवांराचे आव्हान उभे राहिले आहे. श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे विनोद घोसाळकर, अलिबागमध्ये अॅड. श्रद्धा ठाकूर यांना शेकापचे सुभाष पाटील आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचे, तर पेण मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांना भाजपचे रवींद्र पाटील यांच्यासोबत दोन हात करावे लागणार आहेत. या तीन महिला रणरागिणी बलाढ्य पुरुष उमेदवारांचा कसा मुकाबला करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
श्रीवर्धन, अलिबाग, पेण या ठिकाणी राष्ट्रीय पक्षांनी महिला उमेदवारांना संधी दिली आहे. या तीनही महिला उमेदवारांसमोर मोठे आव्हान असतानाच बंडखोरीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. रायगडमधील १९५२ सालापासून निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिलेली नाही, अपवाद फक्त शेकापच्या मीनाक्षी पाटील या आहेत. पक्षाने त्यांना १९९५, १९९९ आणि २००९ साली उमेदवारी दिली होती. त्यामध्ये त्यांचा विजय झाला होता. २००४ साली मात्र काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांनी त्यांना पराभवाची चव चाखायला लावली होती. हा कालावधी पाहता अन्य कोणत्याच प्रमुख राजकीय पक्षाने महिला उमेदवाराला उमेदवारी दिली नाही, अथवा सक्षम महिला उमेदवाराचे नेतृत्व कोणत्याच राजकीय पक्षाला उभे करता आलेले नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
२०१९ च्या निवडणुकीत मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिलांना आमदारकीची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन आणि पेण मतदारसंघामध्ये राजकीय पक्षाने महिलांना उमेदवारी दिल्याने महिलांच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकल्याचे दिसते. त्यामध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे.
अलिबाग आणि पेण या दोन मतदारसंघामध्ये काँग्रेसने अनुक्रमे अॅड. श्रद्धा ठाकूर आणि पेणमध्ये नंदा म्हात्रे यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. अलिबागमध्ये अॅड. श्रद्धा ठाकूर यांच्या विरोधात शेकापचे सुभाष पाटील आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर उमेदवार त्यांचेच दीर राजेंद्र ठाकूर यांचे आव्हान आहे.
पेणमध्ये नंदा म्हात्रे यांना भाजपचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांच्यासह शेकापचे धैर्यशील पाटील यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रसेच्या अदिती तटकरे यांना शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. याच मतदारसंघात काँग्रेसच्या तीन जणांनी बंडखोरी केली आहे, त्यामुळे अदिती यांच्यासमोरचे आव्हान वाढले आहे.
महिला उमेदवारांची संख्या वाढली
- निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुरुष उमेदवारांच्या विरोधात महिला उमेदवार कशी लढत देतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या त्या मतदारसंघातील मतदार हे निवडणुकीत कोणाच्या बाजूने राहणार हे निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे.
तूर्तास प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना विधानसभेचे तिकीट देऊन रायगड जिल्ह्यात निश्चितपणे वेगळा पायंडा पाडला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या वाढली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
महिलांना उमेदवारी देण्याचा शेकापनेच पाडला पायंडा
रायगडमधील १९५२ सालापासून निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिलेली नाही. अपवाद फक्त शेकापच्या मीनाक्षी पाटील यांचा आहे. शेकापने त्यांना १९९५, १९९९ आणि २००९ साली उमेदवारी दिली होती. पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या पेलत विजयश्री खेचून आणली होती. महिला उमेदवारांना निवडणुकीत संधी देण्याचा खरा पायंडा हा शेकापने पाडला आहे. हा राजकीय इतिहास कोणालाच विसरून चालणार नाही. त्या पाठोपाठ आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव जोडले गेले आहे.