Maharashtra Election 2019 : युतीमधील बंडखोरी टळली, उरण मतदारसंघातील पेच मात्र कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 03:05 AM2019-10-04T03:05:41+5:302019-10-04T03:06:00+5:30

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेने परस्परांसमोर उमेदवार न देण्याची सामंज्यस्याची भूमिका घेतली आहे.

Maharashtra Election 2019:  Rebellion in the Shivsena-BJP has been avoided | Maharashtra Election 2019 : युतीमधील बंडखोरी टळली, उरण मतदारसंघातील पेच मात्र कायम

Maharashtra Election 2019 : युतीमधील बंडखोरी टळली, उरण मतदारसंघातील पेच मात्र कायम

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेने परस्परांसमोर उमेदवार न देण्याची सामंज्यस्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे युतीमधील संभाव्य बंडखोरी टळली आहे. मात्र, उरण मतदारसंघातून भाजपचे महेश बालदी हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या मतदारसंघातील शिवसेनेची अडचण कायम असल्याचे दिसते. रातोरात असे नेमके काय घडले, याबाबत दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांसमोर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपचे बंडखोर उमेदवार अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत या ठिकाणी उभे राहण्याच्या तयारीत असतानाच शिवसेनेने पेण विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची बुधवारी घोषणा केल्याने वरिष्ठ पातळीवरील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊन परस्परांना आव्हान उभे राहील, असे काहीच करायचे नसल्याचे ठरले. त्याबाबतचा संदेश त्या-त्या पातळीवरून जिल्हा पातळीवरील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य बंडखोरी रोखण्यात वरिष्ठांना यश आल्याचे बोलले जाते. मात्र, दोन्ही पक्षातील बंडखोर मनोमिलन झाल्याचे सांगत असले, तरी ते प्रामाणिकपणे काम करणार का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे संभाव्य दगाफटक्याची टांगती तलवार भाजपसह सेनेच्या उमेदवारांवर राहणार असल्याचे बोलेले जाते.

उरण मतदारसंघातून भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्या पुढे आव्हान उभे केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही, हे आता ७ आॅक्टोबर रोजीच स्पष्ट होणार आहे. अलिबागमधून भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते हे इच्छुक असल्याने ते गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते; परंतु वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्याने त्यांची भूमिका रातोरात बदली. गुरुवारी शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत अ‍ॅड. मोहिते आणि भाजप कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या ठिकाणी शेकापचे सुभाष पाटील, शिवसेनेचे महेंद्र दळवी आणि काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर अथवा राजा ठाकूर लढत पाहायला मिळणार आहे.

पेणमध्ये सरळ लढत
१श्रीवर्धनमध्येही भाजपचे कृष्णा कोबनाक यांनीही माघार घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचे विनोद घोसाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्यात सामना रंगणार आहे, तसेच पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील यांच्या विरोधात शेकापचे धैर्यशील पाटील यांच्यात सरळ लढत होणे अपेक्षित आहे.

२कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड आणि शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्यात रंगतदार लढत अनुभवता येणार आहे. महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले विरुद्ध काँग्रेसचे माणिक जगताप, पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर आणि शेकापचे हरिश केणी अशी लढत होणार आहे.

३भाजप आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टळणार आहे; परंतु बोहल्यावर चढवलेल्यांना माघार घ्यावी लागल्याने त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मनापासून काम करणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Web Title: Maharashtra Election 2019:  Rebellion in the Shivsena-BJP has been avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.