अलिबाग : शिवसेना आणि भाजप यांच्यामधील वादळ शमले असतानाच आता शिवसेनेला अंतर्गत नाराजीचा फटका कसा बसू शकतो, हे गुरुवारी भाजप आणि शिवसेनेच्या मनोमिलनाचा संदेश देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिसून आले.अलिबाग विधानससभा मतदारसंघातून आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी सुरेंद्र म्हात्रे यांनी सुरुवातीपासूनच मातोश्रीच्या पायऱ्या झिजवल्या आहेत. मात्र, विधानसभेची उमेदवारी ही महेंद्र दळवी यांना मिळाली. उमेदवारी न मिळल्याचे शल्य ते लपवू शकले नाहीत आणि त्यांचा तोल सुटला असावा, अशी चर्चा पत्रकार परिषद संपल्यानंतर भाजप कार्यालयात सुरू होती.महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत २०१४ साली अलिबाग विधानसभेची प्रथम निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांचा सुमारे १५ हजार मतांनी शेकापचे उमेदवार सुभाष पाटील यांनी पराभव केला होता. त्या वेळीही सुरेंद्र म्हात्रे हे उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, तेव्हाही त्यांना नशिबाने हुलकावणी दिली. २०१९ साली होत असलेल्या विधानसभेसाठी त्यांनी पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू केले होते. त्यांना आताही नशिबाने साथ दिली नाही.मातोश्रीवरून आलेल्या आदेशानुसार आपल्या उमेदवारांला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे असल्याचा आदेश प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून युतीचा धर्म पाळण्याबाबतचा संदेश जिल्ह्णातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आला होता. महेंद्र दळवी यांनी शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी शिवसेनेसह भाजपचेही पदाधिकारी विशेष म्हणजे बंडखोरीच्या तयारीत असलेले अॅड. महेश मोहितेही उपस्थित होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.एकदिलाने काम करणार-मोहिते, दळवीआमच्या मनातील सर्व प्रश्न, चिंता मिटल्या आहेत. कोणतीही नाराजी राहिलेली नाही, युतीचा धर्म पाळण्यासाठी सर्व एकदिलाने काम करणार, असे भाजपचे अॅड. महेश मोहिते आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले. सुरेंद्र म्हात्रे हे महेंद्र दळवी यांना उमेदवारी मिळाल्याने खूश आहेत का? असा प्रश्न विचारला असता सुरेंद्र म्हात्रे यांच्या चेहºयावर नाराजीचे भाव दाटून आले.