चाकरमानी कोकणात दाखल; मतदानासाठी गाठले गाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 11:34 PM2019-10-21T23:34:12+5:302019-10-21T23:36:19+5:30
Maharashtra Election 2019: कोकणातील मोठ्या संख्येने मतदार हा मुंबई आणि अन्य राज्यांमध्ये नोकरीनिमित्त जाऊन वसलेला आहे.
दासगाव : कोकणातील मोठ्या संख्येने मतदार हा मुंबई आणि अन्य राज्यांमध्ये नोकरीनिमित्त जाऊन वसलेला आहे. आजही नोकरी करत असला तरी त्याच्या गावच्या मतदानयादीमध्ये त्याचे नाव आहे. सोमवारी विधानसभेच्या मतदानासाठी रविवारी मध्यरात्रीपासूनच मतदारांनी मोठ्या संख्येने कोकणात येण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे संपूर्ण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गजबजून गेला होता.
कोकणाच्या तळागाळापासन लाखोंच्या संख्येने नागरिक नोकरी तसेच व्यवसायानिमित्त मुंबई, गुजरात, पुणे तसेच अन्य राज्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत. ज्याप्रमाणे सणाला सुट्टी असते त्या वेळी आपल्या गावी आवडीने हजेरी लावतात, त्याप्रमाणे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी म्हणजे ग्रामपंचायतीची असो, जिल्हा परिषद असो, खासदारकीची किंवा आमदारकी हे मतदार नागरिक मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या गावी येत असतात. निवडणुकीसाठी उभा राहिलेला उमेदवार हा मतदारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. कारण या मतदारांची संख्या मोठी आहे. प्रत्येक उभा राहिलेला उमेदवार निवडणुकीपूर्वीच या ठिकाणी जाऊन विभागा-विभागाच्या नागरिकांच्या मिटिंग घेऊन त्यांच्या येण्या-जाण्याची सोय अगोदरच करून ठेवतो. त्यामुळे मतदानाच्या वेळी हा मतदार मोठ्या संख्येने हक्क बजावण्यासाठी आपल्या गावी वेळेत हजर राहतो.
सोमवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई, गुजरात, पुणे व अन्य राज्यातून मोठ्या संख्येने मतदार कोकणात दाखल झाला. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासूनच मुुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला खासगी बसेसची गर्दी वाढली होती. ही वाहनांची गर्दी जवळपास सोमवारी दुपारपर्यंत दिसून आली. हजारोंच्या संख्येने बसेसच्या साहाय्याने मतदार हा कोकणात येत होता. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गजबजून गेला होता. या गर्दीमुळे बाहेर राहत असलेल्या मतदारांनी हक्क बजावण्यास काही कसर ठेवली नसल्याचे दिसून आले
अनेक मतदारांची नावे कोकणात तसेच नोकरी व व्यावसायानिमित्त गेलेल्या ठिकाणच्या मतदानयादीत असतात. सध्या एकाच वेळी सर्वत्र विधानसभेची निवडणूक होत असली तरी कोकणातील मतदारांनी गावीच हक्क बजावल्याचे दिसून आले.