म्हसळा : १९३ श्रीवर्धन विधानसभेच्या एका जागेसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यासाठी सकाळपासून तालुक्यातील मतदान केंद्रांवर मतदाराच्या रांगा लागल्या होत्या.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात श्रीवर्धन, म्हसळा, तळा हे तीन तालुके आणि रोहा-माणगाव तालुक्यातील काही भाग मिळून एकूण दोन लाख ५७ हजार ५३२ मतदार आहेत. १,२६,१०१ पुरुष, तर १,३१,४३१ महिला आहेत. त्यापैकी म्हसळा तालुक्यातील मतदारांमध्ये २३,८२० पुरुष आणि २५,९११ स्त्री मतदार असे एकूण ४९,७३१ मतदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हसळा तालुक्यातील मतदान हे निर्णयक ठरले होते.
म्हसळा तालुक्यात एकूण ७० मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. कुठे अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी तहसीलदार शरद गोसावी, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आणि संपूर्ण प्रशासनाने घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, दुपारी ३ वाजेपर्यंत तालुक्यात एकूण ४० टक्के एवढेच मतदान झाले.