Maharashtra Election 2019 : मतदारराजा आज देणार महाकौल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 11:08 PM2019-10-20T23:08:52+5:302019-10-20T23:09:02+5:30

Maharashtra Election 2019 : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. आघाडी विरोधात युती अशी टक्कर होणार आहे.

Maharashtra Election 2019 : Voters Raja will give Mahakaul today | Maharashtra Election 2019 : मतदारराजा आज देणार महाकौल!

Maharashtra Election 2019 : मतदारराजा आज देणार महाकौल!

Next

अलिबाग-  रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. आघाडी विरोधात युती अशी टक्कर होणार आहे. प्रामुख्याने कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे, पनवेलमध्ये भाजपचे, तर महाडमध्ये शिवसेनेचे आणि शेकापचे उमेदवार हे हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत. श्रीवधनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आघाडीचे उमेदवार प्रथमच नशिब आजमावत आहेत. उरण मतदारसंघात भाजपच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला चिंता लागली आहे. काँग्रेससाठी ही लढाई ‘करो या मरो’ अशीच आहे. सुमारे ७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनही निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. मतदारराजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

कडेकोट बंदोबस्त

निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त असून, १३४ पोलीस अधिकारी तर १,९९० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. याचबरोबर ९३ आरसीपी प्लाटून जवान, २० क्यूआरटी जवान, १,२४६ होमगार्ड तर पाच निम लष्करी दलाच्या तुकड्या, १३३ वाहने सज्ज आहेत.

जीपीएस यंत्रणा असलेल्या विविध वाहनांतून ईव्हीएम पोहोचविणार

रायगड जिल्ह्यातील ९३६ वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक ईव्हीएम मशिन सिल करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या-त्या विधानसभा क्षेत्रातील स्ट्राँगरूमकडे रवाना करण्यात येतील. तेथे पुन्हा सिलची तपासणी करण्यात येणार आहे.

मतदारसंघ उमेदवार मतदार

पनवेल 10 5,57,324

कर्जत 11 2,82,247

उरण 08 2,94,151

पेण 14 3,01,857

अलिबाग 13 2,94,538

श्रीवर्धन 14 2,57,532

महाड 08 2,84,345

2,714 मतदान केंद्र

रायगड जिल्ह्यातील मतदान केंद्रावर प्रशासकीय यंत्रणेने तयारी के ली आहे. सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा

पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे ओळखपत्र, बँक, पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल आॅफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, आधार कार्ड

मतदानासाठी ‘सुट्टी’ जाहीर

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाकरिता २१ आॅक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्र म, बँका आदीनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

कुठे काही गडबड झाली तर काय?

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडताना कोठे काही गडबड झाल्यावर त्या ठिकाणी पाच ते सात मिनिटांमध्ये तातडीने शीघ्र कृती दल (क्यूआरटी) पोहोचणार आहे. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तात्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करेल. मतदान संपेपर्यंत सर्व २,७१४ मतदान कें द्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतदारांसाठी ३,६६९ व्हीव्हीपॅट

विधानसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी तीन हजार ६६९ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.

ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था?

ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यास राखीव ६०९ ईव्हीएम मशिन आणि ९२३ व्हीव्हीपॅट मशिन ठेवण्यात आल्या आहेत. एखाद्या केंद्रावरील मशिन बंद पडल्यास केंद्रप्रमुखांकडून पर्यायी मशिन घेता येणार आहेत. तसे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मतदारयादीत नाव कसे शोधाल?
https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर वरच्या बाजुला दिलेल्या लिंकवरील इलेक्ट्रोल सर्ज इंजिनवर क्लिक करा. नावानुसार व आयडी कार्डनुसार इथे नाव तपासता येते. नावानुसार तपासायचे असेल तर त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विधानसभानुसार असे दोन पर्याय दिले आहेत. विधानसभा मतदारसंघानुसार नाव तपासायचे असेल तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ, नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल. कशी मिळवू शकता

मतदान केंद्राची माहिती?

मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदारयादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा आयोगाच्या https://electoralsearch.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या संकेतस्थळावर स्वत:ची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

 

Web Title: Maharashtra Election 2019 : Voters Raja will give Mahakaul today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.