Maharashtra Election 2019: मोहोपाड्यातील सहा केंद्रांवर शांततेत मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 12:14 AM2019-10-22T00:14:07+5:302019-10-22T00:14:38+5:30
Maharashtra Election 2019: मोहोपाडा येथे उरण विधानसभा मतदारसंघासाठी झालेले मतदान शांततेत पार पडले.
रसायनी : मोहोपाडा येथे उरण विधानसभा मतदारसंघासाठी झालेले मतदान शांततेत पार पडले. सकाळपासूनच परतीचा पाऊस थांबलेला होता त्यामुळे मतदार घरातून बाहेर पडले. दुपारी ४ वाजल्यानंतर केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. बूथ कर्मचाऱ्यांना संकलन केंद्रात मतदान सामग्री पोहोचविणे पाऊस नसल्याने सुलभ झाले.
मोहोपाडा जि.प.प्राथमिक केंद्र शाळेत एकूण सहा मतदान केंद्रे होती. मतदान संध्याकाळी ७ वाजता समाप्त झाल्यानंतर सहा केंद्रावरील मतदानाची सरासरी ६५.१४ टक्के आहे. लोकसभेला झालेल्या मतदानापेक्षा ४.५४ टक्के वाढले आहे. वरील सहा केंद्रांशिवाय मोहोपाडा ग्रामपंचायतमधील केंद्रावर ३६.८६ टक्के मतदान झाले तर जनता विद्यालयामध्ये असणाºया दोन केंद्रांवर अनुक्रमे ४६.३० टक्के आणि ४०.७३ टक्के मतदान झाले.
सर्वच केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त
उरण विधानसभा मतदारसंघातील वासांबे-मोहोपाडा जिल्हा परिषद मतदारसंघात दुपारी २ वाजेपर्यंत जेमतेम २८ टक्के मतदान झाल्याचे काही मतदान केंद्रावर दिसून आले. सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत येथील मतदान केंद्रावर काही प्रमाणात गर्दी होती; परंतु दुपारनंतर ठरावीक मतदान केंद्रावर लांबलचक रांग लागल्याचे चित्र दिसून आले. काही मतदारांना सूची न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंच केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त दिसून येत होता.