अलिबाग : सात विधानसभा मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान पार पडत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अपक्ष असे एकूण ७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्वांनाच जिंकण्याची ईर्षा सतावत असल्याने चांगलेच महायुद्ध रंगणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचा नुसता धुराळा उडवून दिला होता. प्रामुख्याने श्रीवर्धन, उरण, कर्जत, पेण आणि अलिबाग या मतदारसंघामध्ये चुरस होणार असल्याने सर्वांचेच लक्ष लागले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने शेकाप आणि शिवसेना यांच्यामध्ये लढत होत आहे. काँग्रेसने अलिबागमध्ये महिलेला उमेदवारी दिली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या एकाने बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहे. पेण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापच्या उमेदवाराची लढत भाजपच्या उमेदवाराबरोबर आहे. याच ठिकाणी काँग्रेसने महिलेला उमेदवारी दिली आहे. पनवेल मतदारसंघामध्ये प्रामुख्याने भाजप आणि शेकाप यांच्यामध्येच दुरंगी लढत होणार आहे. उरणमध्ये शेकाप, शिवसेना आणि भाजपचे बंडखोर उमेदवार यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे शिवसेनेच्या उमेदवारासोबत दोन हात करणार आहेत. महाडमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराची लढाई शिवसेनेच्या उमेदवारासोबत आहे. त्यामुळे येथेही दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा सामना हा शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर होत आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या तिघांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उभे आहेत.