नेरळ : कर्जत विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आज शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून विजय मिळविला. विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश लाड यांचा दारुण पराभव केला. दरम्यान, शिवसेना उमेदवार थोरवे यांनी या मतदारसंघात पहिल्यांदा एक लाख मतदानाचा टप्पा पार केला.
१८९ कर्जत विधानसभा मतदारसंघात २१ आॅक्टोबर रोजी ७०.८१ टक्के मतदान झाले होते. एक लाख ९८ हजार ८४५ मतदारांनी मतदान केलेल्या मतदानाची मोजणी २४ आॅक्टोबर रोजी कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील शेळके मंगला कार्यालयात झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख, इरेश चपळवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ८ वाजता टपाली मतांच्या मोजणीने मतमोजणीला सुरुवात झाली. ११ उमेदवार निवडणूक लढवीत असलेल्या कर्जत मतदारसंघात शिवसेना उमेदवार महेंद्र सदाशिव थोरवे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान आमदार सुरेश लाड यांच्यात मुख्य लढत होती.
कर्जत तालुक्यातील खांडस प्रभागापासून सुरुवात झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या दोन्ही फेऱ्यात शिवसेना उमेदवार महेंद्र थोरवे यांनी आघाडी घेतली होती. हा ट्रेंड सर्व २४ फेºयात कायम राहिला आणि पहिल्या फेरीत घेतलेली आघाडी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी १८,०३३ पर्यंत वाढवली ३२६ मतदान केंद्र असलेल्या कर्जत मतदारसंघात २०६ मतदान केंद्र ही कर्जत तालुक्यात होती, तर १२० मतदान केंद्र खालापूर तालुक्यात होती. मतमोजणीमध्ये महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या बालेकिल्ल्यात खांडस पाठोपाठ पाथरजमध्ये वर्चस्व मिळविले होते, ते बीड जिल्हा परिषद गट वगळता सर्व ठिकाणी टिकवून ठेवले.
शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे बालेकिल्ले असलेल्या सावेळे, नेरळ, उमरोलीमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत असताना सत्ता हातात असलेल्या कर्जत नगरपालिका हद्दीत मात्र शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे हे मागे पडले, त्या वेळी खोपोली, माथेरान या नगरपालिकेत महायुतीच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळाले. कर्जत मतदारसंघात कधीही कोणताही उमेदवार सलग तीन वेळा निवडून आले नाहीत, ते आमदार सुरेश लाड यांच्या पराभवाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.