एलिफंटा बेटावरील ८३ स्थानिक गरीब व्यावसायिकांना दुकाने हटविण्याचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 09:36 PM2024-01-22T21:36:43+5:302024-01-22T21:36:54+5:30

गरीब कुटुंब  रस्त्यावर येण्याची भीती 

Maharashtra Maritime Board officials order 83 local poor businessmen to remove shops from Elephanta Island | एलिफंटा बेटावरील ८३ स्थानिक गरीब व्यावसायिकांना दुकाने हटविण्याचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे आदेश

एलिफंटा बेटावरील ८३ स्थानिक गरीब व्यावसायिकांना दुकाने हटविण्याचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे आदेश

मधुकर ठाकूर

उरण : एलिफंटा बेटावर मागील ५० वर्षांपासून पर्यटक आधारित व्यवसाय करणाऱ्या गरीब  स्थानिकांना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी आठ दिवसात दुकाने काढण्यासाठी धमकावले आहे. रोजीरोटीला मुकावे लागणार असल्याने गरीब व्यावसायिकांवर उपासमारीची संकट येऊन ठेपण्याची भीती निर्माण झाल्याने बेटावरील ८३ कुटुंबियांवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

एलिफंटा बेटावर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारीत शेतबंदर जेट्टीपासुन एक किमी अंतरापर्यंतच्या पोच मार्गापर्यत ८३ स्थानिक व्यावसायिकांची कटलरीची दुकाने आहेत.मागील ५० वर्षांपासून हे स्थानिक गरीब व्यावसायिक छोटी-छोटी दुकाने थाटून चणे-फुटाणे, मके, विविध प्रकारच्या रंगीबेरंगी टोप्या, शोभिवंत वस्तू, कटलरी सामान, खाद्य पदार्थ विक्री करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत.महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारीतील जागा असल्याने भुईभाडे लागु करण्याची अनेक वर्षांपासून व्यावसायिकांची मागणी
आहे.मात्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून व्यावसायिकांच्या या रास्त मागणीकडे सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जात आहे.

बेटावर पर्यटक आधारित पारंपारिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या बेटावरील या स्थानिक व्यावसायिकांना उपजिविकेचे अन्य कोणतेही साधन नाही.त्यामुळे या स्थानिक गरीब व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारे उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत.

पर्यटक आधारित पारंपारिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या बेटावरील या स्थानिक व्यावसायिकांना उपजिविकेचे अन्य कोणतेही साधन नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने खासदार निधीतून बेटावरील या ८३ गरीब व्यावसायिकांना व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणीच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुंदर, सुशोभित एकसारखी दिसणारी आणि एकाच आकाराची दुकाने तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.आराखडा तयार करून दिलेला प्रस्ताव ग्रामपंचायतीने मंजुरीसाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे .मात्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मेरिटाईम बोर्डाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव अद्यापही मंजुरीसाठी प्रलंबित आहे. स्थानिकच झारीतील काही राजकीय शुक्राचार्य गरीब व्यावसायिकांना आडवे जात असल्याने स्थानिक ८३ व्यावसायिकांचा प्रश्न आणखीनच जटील बनला असल्याचा आरोप या  व्यावसायिकांकडून केला जात आहे.

दरम्यान मागील आठवड्यात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे ठाणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी कॅप्टन सुरज नाईक यांनी संबंधित ८३ व्यावसायिकांनाही चर्चा करण्यासाठी ठाणे येथील कार्यालयात पाचारण केले होते.या बैठकीत राजकीय दबावाखाली असलेल्या सीईओनी व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून न घेताच आठ दिवसात दुकाने हटविण्याची धमकी वजा आदेशच दिले असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. गरिबांवर येऊ घातलेले उपासमारीचे संकट  दूर करण्यासाठी या ८३ व्यावसायिकांनी पत्राद्वारे घारापुरी ग्रामपंचायतीलाच यातून मार्ग काढण्याची विनंती  केली आहे.व्यावसायिकांच्या पत्रानंतर  घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीनेही सरपंच मीना भोईर,उपसरपंच बळीराम ठाकूर यांनीही स्थानिक गरीब व्यावसायिकांचा कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढण्याची विनंती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या सीईओंना पत्राद्वारे केली आहे.

Web Title: Maharashtra Maritime Board officials order 83 local poor businessmen to remove shops from Elephanta Island

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.