जंजि-यावर जाणा-या पर्यटकांची जबाबदारी महाराष्ट्र मेरीटाइमवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 02:57 AM2017-10-28T02:57:57+5:302017-10-28T02:58:12+5:30
मुरुड जंजिरा : ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील जवळपास पाच लाखांहून अधिक पर्यटक मुरुडमध्ये दाखल होतात.
संजय करडे
मुरुड जंजिरा : ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील जवळपास पाच लाखांहून अधिक पर्यटक मुरुडमध्ये दाखल होतात. या पर्यटकांना सुरक्षितता देण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे आहे, परंतु गेल्या काही दिवसात या बोर्डाच्या गलथान कामामुळे पर्यटकांच्या जीवास धोका उद्भवला आहे.
जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी खोरा बंदर, राजपुरी जेटी, तसेच दिघी बंदरातून वाहतूक करून पर्यटकांना किल्ल्यात आणले जाते. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून काही इंजीन लाँच फेरीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी देताना बोर्डाने प्रवासी वर्गाची सुरक्षा विचारात घेतलेली दिसत नाही.
इंजीन लाँच किल्ल्यापर्यंत येत नसल्याने भर समुद्रात लाँच थांबवून त्यातील पर्यटकांना शिडाच्या बोटीत स्थलांतरित केले जाते. अशा वेळी भरती अथवा समुद्र खवळल्यास अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा वेळी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डच अपघातास जबाबदार असेल, असा इशारा मुरुड तालुका प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.
जंजिरा किल्ल्यावर सध्या काही इंजीन बोटींना वाहतूक करण्याची परवानगी बोर्डाकडून देण्यात आली आहे. यावर आपली भूमिका मांडताना प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी याबाबत महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांना निवेदन पाठवून प्रवासीवर्गाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. शिडाच्या तसेच इंजीन बोटीतून किल्ल्यावर नेताना जेवढे प्रवासी आहेत तेवढ्या संख्येने लाइफ गार्ड जॅकेट असणे क्र मप्राप्त आहे. पट्टीचा पोहणारा याची जीवरक्षक म्हणून नियुक्ती करणे क्र मप्राप्त आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ बोटी एकाच वेळी आल्यास पर्यटक उतरण्याच्या घाई गडबडीत चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता आहे.अशावेळी एल्फिन्स्टनसारखी दुर्दैवी घटना सुद्धा होऊ शकते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने येथे वेळीच लक्ष घालून ज्या त्रुटी आहेत त्या दूर कराव्यात, अन्यथा प्रवासी वर्गातर्फे आंदोलन छेडू असा इशारा सुर्वे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
इंजीन लाँच किल्ल्यापर्यंत येत नसल्याने भर समुद्रात लाँच थांबवून त्यातील पर्यटकांना शिडाच्या बोटीत स्थलांतरित केले जाते. अशा वेळी भरती अथवा समुद्र खवळल्यास अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती प्रवासी संघटनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे असून त्या कार्यालयाकडून सूचना येताच, पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- अतुल धोत्रे,
बंदर निरीक्षक, मुरुड