Vidhan Sabha 2019: अंतर्गत दगाफटक्याची अवधूत तटकरेंना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:25 PM2019-09-24T23:25:14+5:302019-09-24T23:26:01+5:30

विरोधातील तगडे आव्हान; श्रीवर्धनऐवजी पेण विधानसभेचा विचार सुरू?

Maharashtra Vidhan Sabha 2019 Fear of under-construction riot shores | Vidhan Sabha 2019: अंतर्गत दगाफटक्याची अवधूत तटकरेंना भीती

Vidhan Sabha 2019: अंतर्गत दगाफटक्याची अवधूत तटकरेंना भीती

googlenewsNext

- आविष्कार देसार्ई 

अलिबाग : विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघावर सर्वांच्याच नजरा खिळणार आहेत. कारण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. आदिती यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार म्हणून नुकतेच शिवसेनेचे शिवबंधन बांधलेले अवधूत तटकरे लढणार असल्याचे बोलले जाते. अवधूत हे आदिती यांचे चुलत भाऊ आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्याकडून आदिती यांना निवडून आणण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार यात शंका नाही. तसेच अंतर्गत नाराजीमुळे दगाफटका होण्याची भीतीही असल्याने अवधूत श्रीवर्धनमधून निवडणूक लढण्यापेक्षा पेणमधून लढण्यास उत्सुक असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

श्रीवर्धन मतदारसंघामध्ये २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अवधूत तटकरे निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेचे रवींद्र मुंढे यांचा अवघ्या ७७ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी अवधूत यांच्या पाठीशी काका खासदार सुनील तटकरे यांची ताकद होती. हे कोणीच नाकारू शकणार नाही. तटकरे कुटुंबातील उभा वाद हा सर्वश्रुतच आहे. त्यामुळे अवधूत तटकरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांना श्रवीर्धन मतदारसंघातूनच सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. आता तर त्यांची मुलगी निवडणूक लढणार असल्याने सुनील तटकरे हे सर्व शक्ती मुलीच्या पाठीशी लावणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. गेल्या काही वर्षापासून अवधूत यांचा श्रीवर्धन मतदारसंघातील संपर्क तुटला होता. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते हे विसरता येणार नाही. याच मतदारसंघामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रवींद्र मुंढे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राजीव साबळे, समीर शेडगे आणि अनिल नवगणे या इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. असे असले तरी अवधूत तटकरे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांसह त्यांना आहे. परंतु शिवसेनेतील नाराज असलेल्यांकडून दगाफटका होण्याची भीती अवधूत यांना असल्यानेच ते पेण मतदारसंघाचीही चाचपणी करत असल्याचे बोलले जाते. पेण मतदारसंघामध्ये अवधूत यांचे वडील २००९ साली निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उभे होते. त्यांना त्यावेळी सुमारे ४० हजार मते मिळाली होती. यामुळे कदाचित अवधूत यांच्या आशा पल्लवित झाल्या असाव्यात.

नणंद-भावजय यांचा सामना?
युती झाल्यास पेणची जागाही भाजपला जाणार आहे. त्यामुळे तो आॅप्शन अवधूत यांनाही कठीण आहे. त्यामुळे श्रीवर्धनमधूनच निवडणूक लढतील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. श्रीवर्धनमध्येही युती न झाल्यास भाजपकडून कृष्णा कोबनाक हेही इच्छुक आहेत. त्यामुळे अशा राजकीय खिचडीमध्ये युतीच्या उमेदवारांना विजयाकडे जाताना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार असल्याचे दिसते. श्रीवर्धनमध्ये जर आदिती तटकरे या उमेदवार असतील तर, अवधूत यांच्या पत्नी रेवती तटकरे यांच्या नावाचीही चर्चा असल्याने नणंद-भावजय यांचा सामनाही बघायला मिळण्याची शक्यता आहे.

युतीमधील भांडणाचा फायदा आघाडीला होण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांची आघाडी असल्याने त्यांची ताकद निश्चितच वाढली आहे. वाटाघाटीत श्रीवर्धनमधून शेकापचाही उमेदवार उभा राहू शकतो अशीही चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा शेकापला सोडायची आणि त्या बदल्यात आदिती तटकरे यांनी आणखीन पुढील दोन वर्ष रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवायचे अशाही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
या ठिकाणी शेकापच्या पाटील घराण्यातील एखादा उमेदवार असावा असाही सूर उमटत आहे. दरम्यान, शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सूर चांगलेच जुळलेले आहेत. मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये उमेदवारीवरून अद्यापही जमलेले नाही. त्यामुळे युतीमधील भांडणाचा थेट फायदा हा आघाडीच्या उमेदवाराला होणार असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. परंतु पक्षप्रमुखांनी अद्यापही जाहीर केलेले नाही. श्रीवर्धनमध्ये किती तगडा उमेदवार समोर असला तरी ते आव्हान पेलण्यास एक शिवसैनिक म्हणून तयार आहे.
- अवधूत तटकरे, माजी आमदार, श्रीवर्धन

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Fear of under-construction riot shores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.