- विजय मांडेकर्जत : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असतानाच कर्जत मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रायगड जिल्ह्यात सुरू झाली. त्यामुळे लाड यांचा रक्तदाब वाढला आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री दहाच्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांनी त्यांची भेट घेऊन दीड दवाखान्याच्या बंद खोलीत चर्चा केली. हा आजार ‘राजकीय’ असल्याचे उघडपणे बोलले जाते.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत चार दिवसांवर आली असता या घटनेने कर्जत मतदार संघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास महेंद्र थोरवे यांना शिवसेनेकडून उमेदवारीचा ए बी फॉर्म मिळाल्याने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.कर्जत मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड हे शिवसेनेच्या वाटेवर? असल्याची चर्चा रविवार दिवसभर विधानसभा मतदार संघात रंगली होती. काही सोशल मिडीयाच्या माध्यमातून तसे दाखवण्यात सुद्धा आले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार सुरेश लाड असल्याने कॉग्रेस -राष्ट्रवादी कॉग्रेस - शेकाप आघाडीची उमेदवारी त्यांनाच मिळणार, हे नक्की होते. मात्र शिवसेना - भाजप युती घोषणा अजून झाली नसल्याने १८९ कर्जत विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचा उमेदवार कोण? हे निश्चित झाले नव्हते.भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून देवेंद्र साटम यांनी, आपल्यााला उमेदवारी दिली असून ४ आॅक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. तर शिवसेनेत इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र महेंद्र थोरवे यांनी आपल्यालाच शिवसेना तिकीट देणार, असल्याचे स्पष्ट केले. रविवार दुपारपर्यत असेच चित्र होते. दुपारनंतर एका चॅनेलवर राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या तिकिटावर कर्जत विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढणार,अशी किल्प व्हायलर झाली आणि कर्जत विधानसभा मतदान संघात चर्चा सुरू झाली. त्याच वेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांनी, सोशलमिडियावर आपल्याला शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली अजून सोमवारी दुपारी १२.३० वाजता शिवसेना भवन येथे एबी फॉर्म घेण्यासाठी येण्याचे आदेश दिला असल्याचे सांगितले. त्यांनतर त्यांच्या कार्यालयासमोर फटाकेही वाजविण्यात आले.सुरेश लाड आजारी असल्यावर नेहमी डॉ. प्रेमचंद जैन यांच्या रुग्णायातत दाखल होतात. हा गेल्या वीस - बावीस वर्षांचा इतिहास आहे. मात्र रविवारी दुपारी ते अचानक शहरातील सुसज्ज सुखम रुग्णालयात दाखल कसेझाले? असा प्रश्नही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश कार्यकर्त्यांना पडला. तटकरे प्रकृतीची चौकशी करायला आले यावेळी लाड यांच्या कुटुंबियांपैकी एकही सदस्य उपस्थित नव्हता. त्यामुळे तटकरे यांनी लाड यांची मनधरणी केली का, असे प्रश्न कार्यकर्त्यांना पडले असून ४ आॅक्टोबरपर्यंत निश्चितच उत्तर मिळेल.१९९९ मध्ये काँग्रेसचे विभाजन होऊन राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली. त्यावेळी सुरेश लाड यांनी काँग्रेस पक्ष कदापि सोडणार नाही, असे कार्यकर्त्यांना सांगितले होते. मात्र, थोड्याच दिवसांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून तटकरेंच्या बरोबर हातावर घड्याळ बांधले. आता बरोबर वीस वर्षांनी त्याचीच पुनरावृत्ती होते की काय? अशी चर्चा होत होती, परंतु सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास शिवसेनेने महेंद्र थोरवे यांना एबी फॉर्म दिल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर आल्याने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.कर्जत-खालापूर मतदार संघात सेनेत उत्साह नेरळ : कर्जत खालापूर मतदारसंघात उमेदवारी कोणाला या प्रश्नावर सोमवारी अखेर पडदा पडलाय. शिवसेनेतून माजी उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते थोरवे यांना पक्षाचा एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे.कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेनेकडून ८ उमेदवार इच्छुक होते. त्यापैकी माजी उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र राज्यात कायम असलेला युतीचा पेच आणि विधानसभा निवडणूक लागली असताना सुद्धा महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. यामुळे मतदारसंघात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. काही दिवसांपासून येथील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड हे शिवसेनेचे उमेदवार असल्याच्या चर्चा निर्माण झाल्या होत्या. इच्छुक उमेदवारांमध्ये सगळेच मातब्बर असल्याने त्यांच्या समर्थकांकडून तेच उमेदवार असणार असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर सगळ्या तकवितर्क व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सुरेश लाड यांच्या पक्षांतराची केवळ चर्चाच? शिवसेनेने महेंद्र थोरवेंना दिला उमेदवारीचा एबी फॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 2:31 AM