Vidhan Sabha 2019: पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापचा उमेदवाराचा शोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:00 PM2019-09-25T23:00:55+5:302019-09-25T23:00:55+5:30

चर्चेचे गुऱ्हाळ सुरु; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

Maharashtra Vidhan Sabha 2019 Search for candidate in Panvel Assembly Constituency | Vidhan Sabha 2019: पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापचा उमेदवाराचा शोध कायम

Vidhan Sabha 2019: पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापचा उमेदवाराचा शोध कायम

Next

पनवेल : विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अद्याप पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापला उमेदवार मिळत नसल्याने शेकापसह आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. एकीकडे भाजपने निवडणुकीच्या अनुषंगाने मास्टर प्लॅन आखायला सुरु वात केली असताना अद्याप विरोधी पक्षात उमेदवाराचा थांगपत्ता नसल्याने शेकापला पनवेलमध्ये उमेदवार मिळतो की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे उरण विधानसभा मतदारसंघात शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विवेक पाटील यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या प्रचारार्थ बैठकांना देखील सुरु वात झाली आहे. मात्र अद्याप पनवेलचे चित्र स्पष्ट नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पनवेल विधानसभा मतदारसंघातून पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, प्रीतम म्हात्रेंनी निवडणुकीतून माघार घेतल्याने शेकापसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. शेकापची उमेदवारी घेण्यासाठी पक्षातून कोणताही नेता उत्सुक नसल्याचे समजते. एकेकाळी पनवेल विधानसभा हा शेकापचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, वाढत्या शहरीकरणाचा फटका मोठ्या प्रमाणात शेकापला बसला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीची प्रचिती शेकापला आली. पहिल्यांदाच शेकापला शहरी भागात सपाटून मार खावा लागला. शेकापचे तळ्यात मळ्यात असताना रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांना देखील पक्षाच्या मार्फत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना अद्याप भाजपला टक्कर देण्याचे सोडा साधा उमेदवार देखील जाहीर करण्यात आला नसल्याने आघाडीचे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. शेकापने लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा, अन्यथा आम्ही आमचा विचार करायला मोकळे आहोत अशी चर्चा काँग्रेसच्या एका गोटात सुरू आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Search for candidate in Panvel Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.