Vidhan Sabha 2019: कर्जत-खालापूरमध्ये शिवसेनेत उमेदवारीवरून चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:22 PM2019-09-24T23:22:05+5:302019-09-24T23:22:40+5:30
महेंद्र थोरवेंपुढे सुरेश टोकरे यांचे आव्हान; नक्की कोणाला मिळणार उमेदवारी याचे औत्सुक्य
- कांता हाबळे
नेरळ : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार हे कसून तयारीला लागले आहेत. कर्जत खालापूर मतदारसंघात अद्याप शिवसेनेने उमेदवार जाहीर न केल्याने सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे. महेंद्र थोरवे हे उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात असले तरी पक्षात आठ इच्छुक उमेदवार असून माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे हे देखील रेसमध्ये आहेत. त्यामुळे शिवसेनेत उमेदवरीवरून महेंद्र थोरवे व सुरेश टोकरे यांच्यात रस्सीखेच होणार आहे. त्यामुळे थोरवेंपुढे टोकरे हे मोठे आव्हान असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणूक जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींचा वेग वाढला. आघाडीने समंजस दाखवत जिल्ह्यात मित्र पक्षांना सोबत घेऊन जागा वाटपाचा तिढा सोडवला व उमेदवार कामाला लागलेही. कर्जतमध्ये आघाडीकडून सुरेश लाड हे उमेदवार असल्याचे नक्की झाले आहे. मात्र युतीमधला तिढा आजही कायम आहे. १८९ कर्जत -खालापूर हा मतदारसंघ शिवसेना लढवत आहे. भाजपही या मतदारसंघासाठी आग्रही आहे. परंतु शिवसेना हा मतदार संघ सोडण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेतून उमेदवारीसाठी आठ जण इच्छुक झाले आहे. त्यातील प्रथम नाव हे माजी उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांचे घेतले जाते. थोरवे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून शेकापच्या खटारा या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र थोरवे यांच्या बंडखोरीचा फटका हा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हनुमंत पिंगळे यांना बसला. या मतदारसंघात शिवसेनेला बंडखोरीचा शाप असल्याने पक्षातील ही बंडाळी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांच्या पथ्यावर पडते. या मतदारसंघात शिवसेनेची व शिवसैनिकांची मोठी ताकद असताना केवळ बंडाळीने या मतदारसंघात शिवसेनेच्या हाता तोंडाशी आलेला घास दोन वेळा हिरावला गेला. तेंव्हा यावेळेस नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी शिवसैनिक करीत आहेत.
दरम्यान या वेळेस शिवसेना पक्षातून आठ इच्छुक उमेदवारांमधून महेंद्र थोरवे यांचे नाव पुढे असले तरी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांचे नावही आघाडीवर आहे. टोकरे हे देखील आमदारकीसाठी आग्रही आहेत. खालापुरात टोकरे यांची तितकीशी ताकद नसली तरी ते आगरी समाजाचे नेते आहेत आणि त्यांच्या पाठीशी समाजाची एक मोठी अशी ताकद आहे. ग्रामपंचायत ते रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द आहे. त्यामुळे प्रशासकीय बाबींचा त्यांना मोठा असा अनुभव देखील आहे. नुकत्याच इच्छुक उमेदवारांच्या झालेल्या मुलाखतीत ८ पैकी ६ उमेदवारांनी त्यांना पाठींबा दर्शविला असल्याची अधिकृत माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष
वरिष्ठ पातळीवर सुरेश टोकरे यांचे घनिष्ठ संबंध असल्याने महेंद्र थोरवे यांच्यासमोर टोकरे यांचे आव्हान असणार आहे. मात्र बंडखोरी नंतर पक्षात परत घेतल्याने थोरवे यांनी शिवसेनेसाठी गेली काही वर्षे घेतलेली मेहनत विसरण्याजोगी नाही. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा थोरवे समर्थकांची आहे. कर्जतमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रे वेळी थोरवे यांनी त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना प्रोटोकॉल तोडत सरळ ठाकरे यांच्या बाजूची खुर्ची पटकावली होती. यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.तेव्हा त्यांच्या उमेदवारीला मतदारसंघात शिवसैनिकांकडून देखील विरोध असल्याचे समजते. त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण मारणार बाजी?
नवीन चेहºयाची मागणी जरी दोन्ही तालुक्यातून जोर धरत असली तरी नवीन चेहरा उमेदवारीसाठी देताना येथील बंडाळीचे ग्रहण दुर्लक्षित करून चालणार नाही. उमेदवारीसाठी थोरवे यांनी पूर्ण फिल्डिंग लावली असल्याच्या चर्चा जरी असल्या तरी टोकरे हे देखील मातब्बर राजकारणी आहेत. त्यांनी उमेदवारीसाठी आकाश पाताळ एक केले आहे. तसेच इतर इच्छुकांनी टोकरे यांना दर्शविलेला पाठिंबा हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे महेंद्र थोरवे व सुरेश टोकरे यांच्यात निर्माण झालेल्या चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.