अलिबाग : विधानसभा मतदार संघातून शेकापचे उमेदवार विद्यमान आमदार सुभाष उर्फ पंडीत पाटील यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शेकापसाठी अलिबागची जागा अतिशय महत्वाची असल्याने शेकापने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या माध्यमातून विरोधकांना संदेश देण्याचा प्रयत्न शेकापने केल्याचे बोलले जाते.राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापची आघाडी झालेली आहे. काही ठिकाणी काँग्रेस या आघाडीचा भाग आहे, परंतु अलिबागमध्ये काँग्रेसकडून माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा मुलगा राजा ठाकूर हे निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिवसेनेकडून महेंद्र दळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे हे सुध्दा रेसमध्ये आहेत. भाजपाचे अॅड. महेश मोहिते यांनीही तयारी केली आहे. अद्याप युतीबाबत कोणतीच घोषणा झालेली नाही. त्यामुळे भाजपानेही बरोबरीने उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे निवडणूकीमध्ये चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे.अलिबाग हा शेकापचा बाले किल्ला आहे. गेल्या पाच वर्षात शेकापने काय केले? असे प्रश्न सोशल मिडीयावर उपस्थित केले जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा यांचा समावेश आहे. उमटे धरणातून ६२ गावांना होणारा अशुध्द पाणी पुरवठा हा मुद्दा शेकापसाठी डोकेदुखी ठरत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने याच मुद्द्याचा वापर निवडणूक प्रचारात अस्त्र म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे.शेकाप अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण मतदार संघाच्या जागा लढवणार आहे, तर श्रीवर्धन आणि कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर महाडची जागा काँग्रेस लढणार आहे. अलिबागची जागा शेकापसाठी प्रतिष्ठेची बनली असल्याने त्यांनी मतदार संघात बांधणीला सुरुवात केली आहे.सोमवारी शेकापकडून आमदार सुभाष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तालुक्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने शेकापच्या समर्थकांनी शेतकरी भवन समोर गर्दी केली होती. याप्रसंगी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, आस्वाद पाटील, प्रदीप नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Vidhan sabha 2019 : अलिबागमध्ये शेकापचे शक्तिप्रदर्शन, सुभाष पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 2:33 AM