Vidhan Sabha 2019: अलिबाग विधानसभा मतदारसंघात पाणी, रस्ते, आरोग्याचे प्रश्न ठरणार कळीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:31 AM2019-09-28T00:31:45+5:302019-09-28T00:32:23+5:30

निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा पडणार प्रभाव

Maharashtra Vidhan Sabha 2019 Water, roads, health issues in Alibagh constituency | Vidhan Sabha 2019: अलिबाग विधानसभा मतदारसंघात पाणी, रस्ते, आरोग्याचे प्रश्न ठरणार कळीचा मुद्दा

Vidhan Sabha 2019: अलिबाग विधानसभा मतदारसंघात पाणी, रस्ते, आरोग्याचे प्रश्न ठरणार कळीचा मुद्दा

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : मुंबईपासून अगदी खेटून असणारा जिल्हा म्हणून रायगडकडे पाहिले जाते, तर अलिबाग हे जिल्ह्याच्या राजधानीचे ठिकाण आहे. पर्यटनासाठी निसर्गाने भरभरून दिलेले असतानाही येथील तरुण आजही उद्योगधंद्यासाठी चाचपडताना दिसून येतात. वर्षानुवर्षे पाणी, खराब रस्ते, आरोग्य सुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही जैसे थे असेच आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांना भेडसावणाºया या प्रश्नांचा निश्चितपणे प्रभाव पडणार असल्याचे चित्र आहे.

अलिबागमध्ये प्रामुख्याने महत्त्वाची सरकारी कार्यालयांची मुख्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी दररोज कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे अलिबाग हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग आहे. असे असतानाही या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. अलिबागमध्ये प्रामुख्याने दर्जेदार रस्त्यांची कमतरता आहे. दरवर्षी रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, रस्त्यांची स्थिती काही सुधारताना दिसून येत नाही. यामध्ये लोकप्रतिनिधी हेच ठेकदार असल्याने कोणत्याही सरकारी यंत्रणेचे या विरोधात कारावाई करण्याचे धाडस होत नाही. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर रस्त्यांमुळे अपघात होऊन काहींच्या जीवावरही बेतले आहे. रिक्षा संघटना, विक्रम मिनीडोर संघटना त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी मोर्चे, आंदोलनेही काढली आहेत. त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवस, अलिबाग-वडखळ, पेझारी-नागोठणे या महत्त्वांच्या मार्गाचा समावेश आहे. प्रस्तावित अलिबाग-विरार कॉरिडोरचा प्रश्न प्रलंबित आहे. अलिबाग-मांडवा-मुंबई रो-रो सेवेचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठी गंभीर समस्या म्हणजे अशुद्ध पाण्याचा पुरवठा. काही ठिकाणी डिसेंबरअखेरच पाण्यासाठीही वणवण सुरू होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. गेल्या काही वर्षांपासून उमटे धरणातून परिसरातील ६२ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणातून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल सात कोटी रुपये खर्च करून जिल्हा परिषदेने जलशुद्धीकरण प्रकल्प राबवला होता. मात्र, त्याचेही काम अर्धवट राहिल्याने सुमारे सव्वा लाख नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. सातत्याने अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र, येथील जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. सीटीस्कॅन मशिन, एक्स-रे मशिन यासाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळच नाही. जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची आवश्यकता असताना येथे आरोग्य व्यवस्थेची दैना उडालेली आहे.

तालुक्यासाठी मिळालेला विकास निधी
जिल्हा नियोजन समितीचा आराखडा तब्बल २११ कोटी रुपयांचा, जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प ६० कोटी, दहा नगरपरिषदांचा सुमारे ३०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, तळा, माणगाव, म्हसळा आणि पोलादपूर या नगरपंचायतींचा मिळून सुमारे अडीच कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे.
यासह केंद्र आणि राज्यांच्याही कोट्यवधी रुपयांच्या विकास योजना आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी असतानाही तालुक्यातील विकासकामांचे प्रश्न कसे निर्माण होतात, हाच खरा प्रश्न आहे. 
विकासाच्या नावावर येथील स्थानिकांनी आपल्या जमिनी प्रकल्प उभारण्यासाठी दिलेल्या आहेत. मात्र, आजही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसेच आहेत. त्यामध्ये आरसीएफ, गेल, एचपीसीएल अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, चांगले रस्ते अशा माफक गरजा आहेत. त्याही वेळेत पूर्ण होत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचे. काम करणाºया चांगल्या व्यक्ती या राजकारणात आल्या पाहिजेत. आज रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रामराज विभागातील लाखाहून अधिक नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. यातील गंभीर बाब म्हणजे यावर कोट्यवधी रुपये खर्चही झाले आहेत. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाºयांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल.
- नदीम बेबन, ग्रामस्थ, रामराज

मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. चांगल्या आणि पुरेशा आरोग्य सुविधांचीही वानवा आहे, त्यामुळे जनतेमध्ये उद्रेकाची भावना आहे.
- सुजीत गावंड, सरपंच, माणकुले ग्रामपंचायत

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Water, roads, health issues in Alibagh constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.