महावितरणने कामात वाढवली गती! नागाव, चौलमध्ये चोवीस तासात दिले 11 ग्राहकांना वीज कनेक्शन
By राजेश भोस्तेकर | Published: August 18, 2023 06:14 PM2023-08-18T18:14:42+5:302023-08-18T18:15:12+5:30
अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल येथील अकरा ग्राहकांची घरे महावितरणने चोवीस तासात विजेने झळकवली आहेत.
अलिबाग (रायगड) : पूर्वी नवीन वीज कनेक्शन घ्यायचे झाले तर अनेकदा महावितरण कार्यालयाचे उंबरडे झिजवावे लागत होते. मात्र आता महावितरण प्रशासनही गतिमान होऊ लागले आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल येथील अकरा ग्राहकांची घरे महावितरणने चोवीस तासात विजेने झळकवली आहेत. त्यामुळे महावितरण विभागाने ही कामाची गती वाढवली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याआधी पोयनाड विभागात पाच तासात १८ ग्राहकांना वीज जोडणी केली होती.
नवीन वीज जोडणी घेऊन इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज जोडणी देण्याची महावितरणची मोहीम राज्यभर सुरु आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नव्या वीज जोडणीसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश सर्व परिमंडलांना दिले होते. या कामाबाबत मुख्य अभियंता सुनिल काकडे प्रत्येक मंडळाचा दररोज आढावा घेत आहेत. त्यानुसार महावितरण अलिबाग येथील नागाव शाखेत ११ अर्जदारांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून २४ तासांच्या आत वीज जोडण्या देण्यात आल्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नवीन वीज जोडणीच्या कामाला वेग देण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे, वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी २४ तासाच्या आत वीज जोडणी देण्याचे प्रयत्न कर्मचारी करत आहेत. ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. कागद पत्रांची पडताळणी करून त्यांच्याकडून आवश्यक शुल्क भरून घेतल्यानंतर काही तासातच वीज जोडणी करतात. नागाव विभागात अशा अकरा ग्राहकांना वीज जोडणी करून दिली आहे.
गुरुवारी १७ ऑगस्ट २०२३ रोजी महावितरणच्या नागाव व चौल भागात नवीन वीज जोडणीसाठी एकूण ११ अर्ज प्राप्त झाले. कार्यकारी अभियंता, अलिबाग शैलेश कुमार व अति. कार्यकारी अभियंता अलिबाग उपविभाग १ प्रशांत बानाईत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून २४ तासाच्या आत ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या. याबाबत, अधीक्षक अभियंता पेण इब्राहीम मुलाणी यांनी त्यांचे कौतुक केले. अर्ज केल्यानंतर तातडीने वीज जोडणी मिळाल्याबद्दल ग्राहकांनी महावितरणच्या नागाव शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.