महायुतीला मनसेच्या इंजिनची गरज नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 05:28 AM2024-03-21T05:28:01+5:302024-03-21T05:29:15+5:30
Lok Sabha Election 2024 : चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने येथे आले असता, त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
महाड : मनसे नेते राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची कोणतीही आवश्यकता नसून त्यांना घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे केले. चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने येथे आले असता, त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
काँग्रेसच्या कार्यकाळात कधीही होऊ न शकलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रलंबित स्मारके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झाल्याचे सांगत, तेच खऱ्या अर्थाने देशाचे विकास पुरुष असल्याचा दावा आठवले यांनी केला. भारतीय जनता पक्ष संविधान संपवीत आहे, अशी निव्वळ अफवा असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील राजकीय पक्षांच्या परिस्थितीबाबत भाष्य करताना त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीला त्या पक्षांचे प्रमुख नेतेच जबाबदार असल्याचा आरोप केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आधीच सर्व आमदारांशी चर्चा करून त्यांना गटबाजी करण्यापासून रोखायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत आरपीआय पक्षाला किमान दोन जागांची अपेक्षा असून, तशी मागणी करणार आहे. याबाबत एनडीएतर्फे वरिष्ठ पातळीवर घेतला जाणारा निर्णय मान्य असल्याचेही आठवले यांनी सांगितले.