दक्षिण रायगड भाजपा जिल्हाध्यक्षपदी महेश मोहितेंची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:07 AM2020-01-15T00:07:47+5:302020-01-15T00:08:00+5:30
अलिबाग येथे भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
अलिबाग : भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी अॅड. महेश मोहिते यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विनय नातू यांनी केली.
अलिबाग येथे भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी दक्षिण रायगडमधून अलिबाग, मुरुड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांचा एकमेव अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनय नातू यांच्याकडे दाखल झाला, त्यामुळे अॅड. महेश मोहिते यांची दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
२०१५ मध्ये याच सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणांचा अवलंब करण्यासाठी जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली. युवा मोर्चाच्या बांधणीनंतर पक्षाने अलिबाग, मुरु ड विधानसभा अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. या कालावधीत दोन्ही तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसमवेत भारतीय जनता पार्टीची ताकद वाढविली. आता सत्ता आपल्याकडे नाही; परंतु संघर्ष करून विकासकामांचा झंझावात रायगड जिल्ह्यात आणण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे, असे अॅड. मोहिते यांनी सांगितले. पक्षाने आता माझ्यावर चार विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी म्हणून दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी माझी निवड केली आहे. ही निवड सार्थ ठरविण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे सांगितले.
२०१९ मधील विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्ष युतीमध्ये लढली. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात युतीचे आमदार निवडून आले आहेत. यामध्ये तीन आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. भविष्यातील राजकीय वेध घेता येणाºया सर्वच निवडणुका भारतीय जनता पक्ष ‘एकला चलो’च्या भूमिकेत आणि सर्वपक्षीय महाविकास आघाडीच्या विरोधात लढायच्या आहेत. यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या शिलेदारांनी संघर्ष आणि अधिक सक्षमतेने पक्षाची बाजू तळागाळात पोहोचविण्यासाठी सज्ज राहायला हवे, असे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. या वेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विनय नातू, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, अविनाश कोळी, बिपीन म्हामुणकर, प्रकाश धुमाळ, संजय कोनकर, अमित घाग, सतीश लेले, हेमंत दांडेकर, मिलिंद पाटील, परशुराम म्हात्रे, अॅड. परेश देशमुख, उदय काठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.