जिल्ह्यात सात पंचायत समितींवर महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:26 PM2019-12-30T23:26:34+5:302019-12-30T23:26:41+5:30
अलिबाग, उरण, खालापूर, पोलादपूर, पेण पंचायत समितींवर शेकाप, तर महाड, पाली, कर्जत, श्रीवर्धन पंचायत समितींवर शिवसेना; म्हसळा, मुरूड पंचायत समितींवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर पनवेल पंचायत समितीवर भाजपचा उमेदवार निवडून आला आहे.
मुरुड, पेण पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील (नामाप्र) महिलेसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. पोलादपूर, म्हसळा, तळा आणि महाड पंचायत समितीच्या सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव करण्यात आले होेते. पनवेल पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी सात पंचायत समितींवर महिलाराज आहे. अलिबाग, उरण, खालापूर, पोलादपूर, पेण पंचायत समितींवर शेकाप, तर महाड, पाली, कर्जत, श्रीवर्धन पंचायत समितींवर शिवसेना; म्हसळा, मुरूड पंचायत समितींवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर पनवेल पंचायत समितीवर भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. एकं दर पंचायत समिती सभापतीपदावर शेकापने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
कर्जत सभापतीपदी शिवसेनेच्या सुजाता मनवे
कर्जत : पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा वरचष्मा राखला आहे. सभापतीपदी नेरळ गणातून निवडून आलेल्या सदस्या सुजाता मनवे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेखा हरपुडे यांचा पराभव करून विजय मिळविला. तर उपसभापती म्हणून सेनेच्या सावेळे गणातून निवडून आलेल्या सदस्या भीमा पवार यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जयवंती हिंदोळा यांचा पराभव करून विजय मिळविला.
कर्जत पंचायत समितीच्या सर्वसाधारण असलेल्या सभापतीपदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. अध्यासी अधिकारी विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत सभापतीपदासाठी सुजाता मनवे, रवींद्र देशमुख आणि सुरेखा हरपुडे यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. तसेच उपसभापती पदासाठी भीमा पवार, जयवंती हिंदोळा, सुरेखा हरपुडे आणि कविता ऐनकर यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. मात्र सभापती पदाचे उमेदवार रवींद्र देशमुख यांनी अर्ज मागे घेतला, तर उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करणारे कविता ऐनकर आणि सुरेखा हरपुडे यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सभापती पदासाठी शिवसेनेच्या सुजाता मनवे आणि राष्ट्रवादीच्या सुरेखा हरपुडे यांच्यात निवडणूक झाली. शिवसेनेच्या सुजाता मनवे या ७ मते मिळवून विजयी झाल्या, तर राष्ट्रवादीच्या सुरेखा हरपुडे यांना ५ मते मिळाली. त्यामुळे अध्यासी अधिकारी विक्रम देशमुख यांनी कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी सुजाता मनवे या विजयी झाल्याचे जाहीर केले.
पनवेल पंचायत समितीवर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा झेंडा
पनवेल : पनवेल पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या देवकीबाई लक्ष्मण कातकरी बिनविरोध निवडून आल्या असून, पनवेल पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे.
पनवेल पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीसाठी सोमवारी भाजपच्या देवकीबाई कातकरी यांनी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. शेकापकडे आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने देवकीबाई यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पनवेल पंचायत समितीच्या स्थापनेपासून या ठिकाणी शेकापची सत्ता राहिली आहे. पहिल्यांदाच सत्तापालट होत पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
नवनिर्वाचित सभापती देवकीबाई कातकरी यांचे माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आदींसह नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
उरण पंचायत समितीमध्ये शेकापचे वर्चस्व
उरण : उरण पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापचे अॅड. सागर कडू यांची सभापतीपदी, तर शुभांगी पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी केली.
सभापती आणि उपसभापती पदासाठी शेकापकडून दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
म्हसळा सभापतीपदी उज्ज्वला सावंत
म्हसळा : पंचायत समितीचे सभापती पदाचे अडीच वर्षांनंतर आरक्षण मागीलप्रमाणेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहिल्याने पंचायत समिती आंबेत गणातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आणि सुरुवातीला सव्वा वर्षे सभापती पदावर काम केलेल्या उज्ज्वला सावंत यांची सभापतीपदी, तर उपसभापती पदावर वरवठणे गणातून निवडून आलेले मधुकर गायकर यांची निवड झाली. म्हसळा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आहे.
पेण दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध
पेण : पंचायत समिती सभापती, उपसभापती पदासाठी सोमवारी झालेली निवडणूक बिनविरोध झाली आहे. शेकापचे पेण पंचायत समितीवर निर्विवादपणे वर्चस्व राहिल्याने सभापती पदासाठी सरिता म्हात्रे, तर उपसभापती पदासाठी सुनील गायकर यांचे प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाले. यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे पेण तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय कांबळे यांनी जाहीर केले.
यापूर्वी या गणात काँग्रेस पक्षाचे बळीराम गणा ठाकूर व बाबूशेठ म्हात्रे या दिग्गज नेत्यांना या विभागातून सभापती पदाचा सन्मान मिळाला होता. तब्बल ३० वर्षांच्या कालखंडानंतर सरिता म्हात्रे यांना हा बहुमान मिळाला आहे. या विजयानंतर फटाके वाजवून शेकाप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला; तर रथातून थेट वाशी गावी मिरवणुकीने सरिता म्हात्रे यांना सन्मानाने नेण्यात आले.
पोलादपूर पंचायत समितीवर शेकापचा लाल बावटा
पोलादपूर : पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडीच्या नंदा चांदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी तहसीलदार दीप्ती देसाई यांनी निवडीचे पत्र देऊन निवड जाहीर केली असून, पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याने शेकापचे स्वप्न पूर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पोलादपूर पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर पोलादपूरमध्ये सर्वसाधारण महिलापद जाहीर झाले होते.
श्रीवर्धन सभापतीपदी शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध
श्रीवर्धन : पंचायत समितीच्या सभापतीपदी बाबुराव चोरगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चोरगे यांचा सभापती पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना बिनविरोध सभापती म्हणून घोषित केले. चोरगे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
श्रीवर्धन पंचायत समिती सभापतीपद मीना गाणेकर यांच्याकडे होते. पाटील यांना सव्वा वर्षे वाटून देण्यात आले होते. दिघी गणाच्या सदस्या सुप्रिया गोवारी यांची उपसभापतीपदी निवड झाली.
माणगाव उपसभापतीपदी राजेश पानावकर
माणगाव : पंचायत समितीची सभापती पदाची निवडणूक काही दिवसांपूर्वी लागली होती. यावेळी सभापती पदाचे आरक्षण अनुसूचित जातीस पडल्याने, कोणीही अनुसूचित जातीचा सदस्य नसल्याने सभापतीपद रिक्त राहिले. मात्र ३० डिसेंबर रोजी उपसभापती पदाच्या निवडणुकीत राजेश पानावकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
मागील अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सेनेचे प्राबल्य असल्याने याआधी अनुक्रमे महेंद्र तेटगुरे, राजेश पानावकर, सुजीत शिंदे यांना १० महिन्यांप्रमाणे सभापतीपद व अडीच वर्षांसाठी माधवी समेळ व ममता फोडके यांना ठरवून दिले होते. परंतु सध्या सभापतीपद रिक्त झाल्याने उपसभापती पदाची निवडणूक महत्त्वाची ठरली.
खालापूर सभापतीपदी वृषाली पाटील; उपसभापतीपदी विश्वनाथ पाटील
वावोशी : खालापूर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने तालुक्यात महाविकास आघाडीचा नारळ फुटल्याची चर्चा असली तरी शिवसेना मात्र पदापासून वंचित राहिली आहे.
सभापतीपदी वासांबे गणातून शेतकरी कामगार पक्षाकङून निवडूून आलेल्या वृषाली पाटील यांची निवड झाली; तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या विश्वनाथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शेकापच्या वृषाली पाटील यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे सदस्य हजर राहिल्याने निवडणूक बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते.
अलिबाग शेतकरी कामगार पक्षाची बाजी
अलिबाग : पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुका सोमवारी पार पडल्या. त्यामध्ये शेकापचे प्रमोद ठाकूर यांची सभापतीपदी, तर मिनला माळी यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असताना तो फॉर्म्युला मात्र येथे चालला नाही.
निवडणुकीच्या प्रक्रियेला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. शेकापचे प्रमोद ठाकूर आणि शिवसेनेचे गजानन बुंदके यांनी सभापती पदासाठी, तर शेकापच्या मीनल माळी आणि भाजपचे उदय काठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी संपल्यावरही कोणत्याच उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी हात उंंचावून निवडणुकीला सुरुवात केली. शेकापचे प्रमोद ठाकूर यांना आठ, तर गजानन बुंदके यांना सहा मते मिळाली, त्याचप्रमाणे उपसभापती पदासाठी शेकापच्या मीनल माळी यांना आठ आणि भाजपचे उदय काठे यांना सहा मते मिळाली. शेजाळ यांनी प्रमोद ठाकूर याची सभापतीपदी, तर मीनल माळी यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
अलिबाग पंचायत समितीमध्ये शेकापचे आठ सदस्य आहेत, तर शिवसेनेचे तीन, भाजपचा एक आणि काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील, सिद्धनाथ पाटील, राजाराम गावंड, प्रफुल्ल पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह अन्य शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
पाली पंचायत समितीवर फडकला भगवा
पाली : सुधागड-पाली पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे रमेश सुतार, तर उपसभापतीपदी उज्ज्वला देसाई यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. सुधागड पाली पंचायत समिती सभापती व उपसभापतीची निवडणूक ३० डिसेंबर २०१९ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार दिलीप रायान्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पंचायत समितीच्या नामदेवशेठ खैरे सभागृहात दुपारी पार पडली.
यावेळी शेकाप-राष्ट्रवादी आघाडीकडून सभापती पदासाठी सविता हंबीर, तर शिवसेनेकडून रमेश सुतार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. तर उपसभापती पदासाठी आघाडीकडून साक्षी दिघे, तर शिवसेनेकडून उज्ज्वला देसाई यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
यावेळी समसमान नामनिर्देशन पत्र असल्याने आणि दोन्ही पक्षांचे संख्याबळ समसमान असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार यांनी ईश्वर चिठ्ठीने निवड करण्याचे ठरविले. त्यानुसार मराठी शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी अंकिता कदम आणि प्रिया खरिवले या दोघींनी काढलेल्या ईश्वर चिठ्ठीतून अनुक्रमे सभापतीपदी रमेश सुतार आणि उपसभापतीपदी उज्ज्वला देसाई यांची नावे निघाल्याने निवडणूक अधिकारी दिलीप रायान्नावर यांनी रमेश सुतार आणि उज्ज्वला देसाई यांना विजय घोषित केले. या निवडणूक प्रक्रियेवेळी नायब तहसीलदार दत्तात्रय कोष्टी व गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे उपस्थित होते.
मुरूड सभापतीपदी आशिका ठाकूर बिनविरोध
मुरुड :सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आशिका ठाकूर तर उपसभापती शिवसेनेचे चंद्रकांत मोहिते यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे. मुरुड पंचायत समितीमध्ये एकू ण चार सदस्य असून काँग्रेस आय व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एक एक सदस्य आहे. तर शिवसेनेचे दोन सदस्य आहेत. परंतु सोमवारी सभापती पदाचा अर्ज दाखल करताना शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन अर्ज दाखल केला. त्यामुळे आशिका ठाकूर यांची बिनविरोध निवड होण्यास अगदी सोपे गेले. सूचक न मिळाल्यामुळे नीता घाटवळ अर्ज दाखल करू शकल्या नाही.
दासगाव पंचायत समिती शिवसेनेची सत्ता
दासगाव : महाड पंचायत समितीच्या सभापती पदाकरिता कार्यकाल संपल्यानंतर सोमवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या ममता गांगण यांची, तर उपसभापतीपदी सदानंद मांडवकर यांची निवड झाली.
महाड पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. येथील दहापैकी नऊ सदस्य हे शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचे दत्ताराम फळसकर आणि उपसभापती सिद्धी खांबे यांच्या कार्यकाल समाप्तीनंतर या दोघांनीही राजीनामे दिले. उपस्थितांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन के ले.