अलिबाग : विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागणार आहे. मतपेटी फुटल्यावर कोण आपटणार आणि कोण विजयी मिरवणूक काढणार? याकडेच सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला त्या त्या विधानसभा क्षेत्रामध्ये सुरुवात होणार आहे.
अलिबाग, उरण, पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघामध्ये कडवी झुंज झाल्याने येथील निकालाबाबत सर्वांना उत्सुकता आहे. ७८ उमेदवारांपैकी सात उमेदवारांना विधानसभेचा दरवाजा उघडला जाणार आहे. प्रशासनाने निकालासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात केला आहे. सकाळी ८ वाजल्यापासून निकालाला सुरुवात होणार आहे.२०१४ मध्ये मतदानाची टक्केवारी आणि २०१९ मध्ये झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा विचार करता तब्बल पाच टक्क्यांची घट दिसून येते. या घटलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार हे पाहणेही उत्सुकतचे आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने शेकापचे सुभाष पाटील आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्यामध्येच लढत झाली. दोन्हीकडील समर्थक आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचे सांगत आहेत. असे असले तरी मुरुड तालुक्यातील मतदार आणि काँग्रेसने घेतलेली भूमिका कोणाच्या पथ्यावर पडणार, यावरच विजयी उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे. मतदारसंघामध्ये शिवसेनेची जोरदार हवा झाली होती; परंतु शेकापमधील सर्व धुरंदर नेते हे राजकारणात माहीर आहेत. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघात निवडणुकीत खेळलेले राजकारण उमेदवाराला विजयी करणार का? हे पाहणे गरजेचे आहे.
पेण विधानसभा मतदारसंघात शेकापचे धैर्यशील पाटील आणि भाजपचे रवींद्र पाटील यांच्यात लढत झाली आहे. शेकापकडे असलेले पारंपरिक मतदार हे जमेची बाजू आहे, तसेच त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस होती. रवींद्र पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काँग्रेसची किती मते वळली, हे आताच सांगता येणार नाही. या ठिकाणी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिल्याने काँग्रेसला मानणारा मतदार हा काँग्रेसकडेच राहणार आहे. युतीमधील शिवसेनेची ताकद विजयासाठी रवींद्र पाटील यांच्या मागे उभी होती का हे निकालानंतरच कळणार आहे.
महाड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने दुरंगीच लढत होणार होती. शिवसेनेचे भरत गोगावले यांना भाजपचे बळ तर काँग्रेसचे माणिक जगताप यांच्या पाठीशी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत खरेच झाली का, हेही गुरुवारी स्पष्ट होणार आहे.श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्यापाठीशी त्याचे वडील खासदार सुनील तटकरे उभे होते. तर शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांचे हात भाजपने मजबूत केले का हे निकालानंतर स्पष्ट होईल.
कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड आणि शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्या समर्थकांनी उमेदवारांना आधीच विजयी करून टाकले आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीशी भाजपची साथ होती का? तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड आणि हनुमंत पिंगळे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
उरण मतदारसंघामध्ये मात्र सर्वात कडवी झुंज आहे. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी आव्हान उभे केले. त्यामुळे त्यांच्यात मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. शेकापचे विवेक पाटील हे शेकापकडून लढले आहेत. त्यांचा पारंपरिक मतदार हा लाल बावट्याच्या छायेखालीच राहणारा आहे. त्यामुळे येथे विजयासाठी चांगलीच चुरस आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनेही अॅड. राकेश पाटील यांना उमेदवारी दिली होती. आगरी-कोळी मतदारांना एकत्र करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून या विभागात सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निकाल लागल्यावर स्पष्ट होणार आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर आणि शेकापचे हरेश केणी यांच्यातच दुरंगी सामना झाला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ठाकूर यांच्या विरोधात नवखा उमेदवार दिल्याने तो कितपत ठाकूर यांच्या पुढे टिकला हे गुरुवारी दुपारपर्यंत कळणार आहे.