अलिबाग : विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता रायगड जिल्हा प्रशासनाला वाटत आहे. त्याला अटकाव करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांनी जमावबंदी आदेश जारी केला आहे. त्यामुळे मतमोजणीचे ठिकाण आणि परिसरामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी दिसणार नाही.
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये २१ आॅक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्यामध्ये तिघे जण जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी तब्बल ५५ जणांवर गुन्हा दाखल केला होता. निकाल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर तसेच परिसरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी करतात. एखाद्या राजकीय पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही आणि दुसºया राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही विरोधी घोषणा दिल्या तर त्या ठिकाणी दोन गटामध्ये बाचाबाची, हाणामारी होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
मतमोजणीसाठी जिल्ह्यात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये एसआरपीएफची एक कंपनी, सीआयएसएफचे पाच प्लॅटून, आरसीपी चार प्लॅटून, दोन क्यूआरटी प्लॅटून, ६६२ पोलीस कर्मचारी, ५७ सहायक पोलीस निरीक्षक, १८ पोलीस निरीक्षक आणि आठ उपपोलीस अधीक्षकांचा समावेश आहे.
प्रत्येक कार्यकर्त्यांना आपलाच उमेदवार निवडून यावा अशी इच्छा असणार आहे. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच जनतेच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जिल्हादंडाधिकारी यांनी अलिबाग, पेण, कर्जत, महाड आणि श्रीवर्धन मतदारसंघातील मतमोजणी ठिकाणी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी प्रक्रि या सुरू झाल्यापासून ते मतमोजणी प्रक्रि या पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक रायगडचे जिल्हा दंडाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी काढले आहे.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
१९१ पेण विधानसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लिटील एन्जेल मीडियम स्कूल पेण येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीसाठी एकूण १४ टेबल लावण्यात आले असून, एकूण १५० प्रशिक्षित कर्मचारी मतमोजणीकरिता नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीची सुरुवात पोस्टल बॅलेट पेपरच्या मतमोजणीने करण्यात येणार असून एकूण २७ राउंडमध्ये ३७५ मतदान केंद्रावरील मतमोजणी केली जाणार आहे. साधारणत: दुपारी २ वाजेपर्यंत मतमोजणीचे काम पूर्ण होऊन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
मतमोजणी केंद्रावर व परिसरात कडक सुरक्षा तैनात केली असून, त्यामध्ये दोन डीवायएसपी, तीन पीएसआय, १७ एपीआय व पीएसआय, २० वाहतूक पोलीस, रॅपीड अॅक्शन फोर्सच्या चार प्लॅटून, १२० पोलीस कर्मचारी असा पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.
महाडमध्ये डॉ. आंबेडकर स्मारकात पोलीस तैनात
संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष असलेल्या महाड विधानसभा मतदारसंघातीत लक्षवेधी लढतीकडे संपूर्ण रायगडवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेने विद्यमान आमदार भरत गोगावले आणि काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये ही लढत आहे. मतदारसंघात दोन लाख ८४ हजार ३४५ मतदारांपैकी एक लाख ९० हजार ४४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.च्गुरुवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात मतदारसंघाची मतमोजणी होणार असून प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी दरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे.