मोलकरणींना अनेक घरांचे दरवाजे बंद; कुटुंब कसे चालणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:20 AM2021-04-18T00:20:33+5:302021-04-18T00:20:48+5:30
पनवेल परिसरातील स्थिती : नुसते बसून राहण्याशिवाय पर्याय नाही
- अरुणकुमार मेहत्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : गत वर्षात कामागारांचे झालेले हाल, यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याची पुनरावृत्ती होत आहे. घरकाम करणाऱ्या मोलकरणींवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या भीतीने अनेक घरांत काम करणाऱ्या स्त्रियांना काम करण्यास मनाई केली जात आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
पनवेल परिसरात रहिवासी भयभीत झाले आहेत. त्यामुळे काम करणाऱ्या स्त्रियांना कामावर येण्यास मनाई करत आहेत. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांना काम शोधण्याची वेळ आली आहे. एका घरी काम करून महिन्याला हजार ते बाराशे रुपये मिळतात. एक मोलकरीण साधरणत: तीन- चार घरी काम करत असते. यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. मात्र, आता काही घरांनी तूर्त काम बंद केल्याने घरी बसून राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.
घर कसे चालवायचे, याचीच चिंता
वर्षभरापासून महागाईचा भडका उडत चालला आहे. घरसामान खरेदीसाठी पैसे जास्त मोजावे लागतात. कोरोनामुळे सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कामावर जाता येत नसल्याने नवीन संकट निर्माण झाले आहे. घर कसे चालवायचे, असा प्रश्न महिलासमोर उभा राहिला आहे. त्याचबरोबर आजारपण , लाइट बिल , पाणी बिल , अन्नधान्य खरेदीसाठी पैशाची चणचण भासत आहे.
एका घरातून मिळतात ७०० ते ९०० रुपये
अनेक घरी काम केले तरच चार पैसे मिळतात. गत वर्षी खूप उपासमार झाली. उसनवारी करत दिवस काढले. यंदा तरी चांगले दिवस येतील अशी आशा होती; पण पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने अनेक ठिकाणचे काम बंद झाले आहे. काय करावे सुचत नाही. -इंदुमती पवार, मोलकरीण
सरकारने गहू आणि तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे; पण ते किती दिवस पुरणार. पनवेल येथे ऑफिसची साफसफाईचे काम करत होते ते बंद झाले आहे. आता एका घरी काम करते आहे. त्यातून ६०० रुपये मिळतात. त्यातून माझे घर कसे चालवणार, हा प्रश्न आहे. -नीला सरवदे, मोलकरीण
गेल्या तीन वर्षांपासून पाच घरी काम करत आहे. त्यातून चांगले पैसे मिळत असत; परंतु गतवर्षीपासून कोरोनाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे दोनच घरी काम करते आहे. काय करणार यातून घर भागत नाही. - प्रिया पवार, मोलकरीण